Ratnagiri Surakshit Bachpan Abhiyan: रत्नागिरीत ‘सुरक्षित बचपन’ जनजागृती अभियानाचा शुभारंभ; रा. भा. शिर्के प्रशालेत बालसुरक्षेचा जागर

Ratnagiri Surakshit Bachpan Abhiyan: रत्नागिरीत 'सुरक्षित बचपन' जनजागृती अभियानाचा शुभारंभ; रा. भा. शिर्के प्रशालेत बालसुरक्षेचा जागर

३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम; बालकांवरील लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम

रत्नागिरी : Ratnagiri Surakshit Bachpan Abhiyan संदर्भात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटकांना आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) निर्देशानुसार रत्नागिरीत ‘सुरक्षित बचपन’ जनजागृती अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. रविवारी शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत या विशेष मोहिमेचा प्रारंभ झाला असून, २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील शाळांमधून विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांमध्ये बालसुरक्षा व ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधवांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण अभियान राबवले जात आहे. जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील, जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्या प्रिया लोवलेकर आणि मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांच्यासह शिक्षक व सुमारे २०० विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मेरा बचपन, मेरा अधिकार’चा संदेश; अन्यायाविरोधात आवाजाचे आवाहन
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘मेरा बचपन, मेरा अधिकार’ हा महत्त्वपूर्ण संदेश देत वैयक्तिक सुरक्षिततेचे आणि स्वतःचे संरक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी सांगितले की, "कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी सावध राहावे आणि त्याविरोधात न घाबरता आवाज उठवणे गरजेचे आहे. जर कोणी त्रास देत असेल किंवा गैरवर्तन करत असेल, तर विद्यार्थ्यांनी अजिबात न घाबरता तातडीने आपले आई-वडील किंवा शिक्षकांना सांगावे."

Horizon techno.

पॉक्सो कायद्याची माहिती अन् जनजागृती सप्ताहाचे नियोजन
अभियानांतर्गत बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ अर्थात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्याच्या विविध तरतुदींबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, रॅली आणि भित्तीचित्रांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षकांसोबतच वसतिगृह अधीक्षक, स्कूल बस चालक आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. न्यायाधीश, वकील, बाल संरक्षण अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ व विशेष पोलीस पथकाद्वारे शाळांमध्ये मार्गदर्शन केले जाईल.

विविध शाळांमधील आगामी उपक्रम:

२९ ऑक्टोबर: सकाळी ९.३० वाजता – जी. जी. पी. एस. इंग्लिश माध्यम हायस्कूल

३० ऑक्टोबर: दुपारी २.०० वाजता – ए. ए. देसाई हायस्कूल

३१ ऑक्टोबर: सकाळी ९.३० वाजता – दामले हायस्कूल

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या जनजागृती कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.