नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; कुत्र्यांच्या नसबंदी प्रक्रियेबाबत व शस्त्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
चिपळूण : Chiplun Stray Dog Problem Bapu Kane संदर्भात चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि गुंतागुंतीचा बनत चालला आहे. शहरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आबालवृद्धांना भटक्या कुत्र्यांमुळे होणारा त्रास लक्षात घेता नगरपालिकेने यावर तात्काळ ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कुत्र्यांच्या गळ्यात लोळणे बांधण्याच्या नगरपालिकेच्या विचाराला श्वानप्रेमींकडून विरोध होत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अडचणीत सापडले आहेत. मात्र, नागरिकांची सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा विषय असल्याने नगरपालिकेने मागे न हटता कायदेशीर चौकटीत राहून ठोस कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
नसबंदी प्रक्रियेबाबत आणि वैद्यकीय सुविधांवर प्रश्नचिन्ह

बापू काणे यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या नसबंदी प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न व शंका आहेत.
प्रत्यक्षात नसबंदीच्या शस्त्रक्रिया योग्य पद्धतीने केल्या जातात का?
त्यासाठी प्रशिक्षित आणि पात्र पशुवैद्यकीय डॉक्टर उपलब्ध आहेत का?
आवश्यक उपकरणे व सुविधा योग्य आहेत का? आणि या मोहिमेचे नेमके परिणाम काय आहेत?
या सर्व गोष्टींची स्पष्ट आणि पारदर्शक माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घ्यावा
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता केवळ नगरपरिषद प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट नागरिकांच्या दैनंदिन सुरक्षेशी संबंधित बनला आहे. त्यामुळे शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या संवेदनशील प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करून ठोस उपायांसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बापू काणे यांनी केले आहे. श्वानप्रेमींच्या प्राण्यांविषयीच्या प्रेमाचा आदर करतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असा सुवर्णमध्य त्यांनी सुचवला आहे.













