कोकणातील नारळाच्या बागा टिकविण्याचे बागायतदारांसमोर आव्हान

दापोली : कोकणात नारळापासून बनविलेल्या विविध पदार्थ यांची चव अनेकांच्या जिभेवर टिकून राहते. मात्र, कोकणातील याच नारळाच्या बागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आता बागायतदारांच्या समोर आहे. फयान वादळात आणि निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या बागा उजाड दिसत आहेत. नैसर्गिक आपत्ती हे कारण बागा उद्ध्वस्त करण्यास असले तरी मनुष्यबळ, उंच माडांवर चढणारे कुशल कारागीर हे सर्व प्रश्न कोकणात भेडसावू लागले आहेत. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात ८० टक्के नारळ हा केरळ आणि अन्य राज्यातून येत आहे. कोकणात सरकारमान्य माडी व्यवसाय मोठा आहे. यातून मोठे आर्थिक गणित मांडले जाते. मात्र, या व्यवसायातील अनंत अडचणी यामुळे हा व्यवसाय देखील डबघाईला आला आहे. केरळ आणि अन्य राज्यातून येणारा नारळ हा आकारानुसार १५ ते रुपये १८ इतक्या किमतीत मिळतो तर स्थानिक नारळाचा ३० ते ४० दर आहे. तरीही, हॉटेल, घरगूती खानावळ आणि नारळपासून बनविणाऱ्या पदार्थांसाठी येथील नारळ कमी पडतो. पर्यटक कोकणातील नारळ आवर्जून घेऊन जातात. मात्र दिवसेंदिवस कमी होणारे नारळाचे उत्पन्न हा कोकणासाठी चिंतेचा विषय आहे.

कोकणातील सुपारी, नारळ, आंबा, काजू, आणि येथे अन्य पिकणारी फळे यावर येथील अर्थकारण अवलंबून असायचे. मात्र, कुशल कारागिर, बागांची देखभाल, मजूर आदींच्या खर्चाचा विचार करता सगळेच महाग झाले आहे. त्यामुळे बागा असलेल्या ठिकाणी आता हॉटेल्स, खानावळ असे व्यवसाय उभे राहत आहेत. नारळाची नवीन लागवड होत नसल्याने आता काही ठराविक ठिकाणीच नारळ बागा नजरेस पडतात. कोकणातले नारळ, शहाळी याच्या चवीचा अनेक ग्राहक आवर्जून उल्लेख करतात. दरही चांगला मिळतो. मात्र वानर, माकड यांची वाढती पैदास बागायतदार यांचे साठी संकट आहे. त्यामुळे अनेकांनी नवीन लागवड केलेली नाही.

नारळ बागेची नीट मेहनत केली तर वर्षकाठी एक झाड शंभरपेक्षा अधिक फळ देते. वडिलोपार्जित बागा आहेत पण बागेत काम करण्यासाठी आणि, नारळावर चढणारे कारागीर मिळत नाहीत. एखादा कुशल कारागिर मिळाला तर आर्थिक गणित परवडत नाही. त्यामुळे कोकणातला नारळ हा चवदार असला तरी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. –सुबोध कोझरेकर,नारळ बागायतदार कोळथरे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 26/Dec/2024