रत्नागिरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महाराष्ट्रातील सर्वांत जुन्या १९६ वर्षाच्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये प्रशस्त सभागृह होणार आहे. याचा आनंद केवळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नव्हे, तर या परिसरातील सर्वांना होईल. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वेळी हा कार्यक्रम होत असून या इमारत बांधणीसाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले.
वाचनालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, वाचनालयाचे अध्यक्ष अॅड, दीपक पटवर्धन उपस्थित होते.
अध्यक्ष अॅड, पटवर्धन म्हणाले की, १८२८ साली वाचनालय जे. आर. डी. टॉर्च यांनी सुरू केलं. लवकरच ते १९७ वे वर्ष पूर्ण करेल.

महाराष्ट्रातले सर्वांत जुने पण सर्वात अद्ययावत वाचनालय आहे. ज्या शहरातील वाचनालये गजबजलेली असतात तिथली संस्कृती टिकून राहते व बहरते. आजच्या मोबाईलच्या युगातही २२०० सभासद येथे नियमित येतात, ही वाचनालयाची ताकद आहे. लोकमान्य टिळकांचे वडील या वाचनालयाचे सदस्य होते. नगर वाचनालयाचे नामकरण स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी केले आहे.
या वाचनालयात स्वामी स्वरूपानंद नियमित येत होते. वाचनालयात एक लाख १५ हजारांपेक्षा जास्त ग्रंथसंपदा व दुर्मीळ ग्रंथही आहेत, प्राचार्य (कै.) डॉ. सुभाष देव यांच्या स्मरणार्थ सुखदा देव यांनी एक लाख रुपयाचा धनादेश वाचनालयाकडे सुपूर्द केला.
उद्योगमंत्र्यांची मदत
वाचनालयाच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. मात्र, याकरिता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा प्रश्न सोडवून वाचनालयाला पुन्हा जागा उपलब्ध झाली. तसेच सामंत यांनी भरीव आर्थिक मदत केल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख अॅड. पटवर्धन यांनी भाषणात केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 27/Dec/2024












