सून गिरीजा राऊत यांच्या मानसिक छळाच्या आरोपांवर करुणा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ विधानावरून सरकारला टोला
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut News) यांच्या कुटुंबात सुरू असलेला कौटुंबिक वाद आता राजकीय पटलावर चांगलाच गाजू लागला आहे. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर त्यांची सून गिरीजा राऊत यांनी छळाचे गंभीर आरोप केल्यानंतर, या प्रकरणात आता करुणा मुंडे यांनी उडी घेतली आहे. या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे यांनी राऊत कुटुंबावर जोरदार निशाणा साधला असून, पीडित सुनेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे.
“महिलांचं आयुष्य काय खेळ आहे का?” – करुणा मुंडेंचा सवाल
या संवेदनशील प्रकरणावर बोलताना करुणा मुंडे यांनी विनायक राऊत यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. “विनायक राऊत म्हणतात की सुनेने पैशांची मागणी केली, पण तुम्ही तिचे जीवन उद्ध्वस्त केले आहे त्याचे काय? श्रीमंत लोकांना आणि पुढाऱ्यांना महिलांचे आयुष्य म्हणजे काय खेळ वाटतो का? लग्नाचा विचार करताना नेमका काय विचार केला जातो?” असा थेट आणि रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, गृहकर्ज (लोन) भरण्यासाठी जर सुनेने पैशांची मागणी केली असेल, तर त्यात काय चूक आहे, असे म्हणत त्यांनी गिरीजा राऊत यांची बाजू लावून धरली.
“मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा, मग बघा न्याय कसा मिळतो”
राज्यातील महिलांच्या प्रश्नांवरून प्रशासनाला धारेवर धरताना करुणा मुंडे यांनी एक मागणी केली आहे. “सध्या राज्यात महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. तिथे तात्काळ योग्य व्यक्तीची नियुक्ती करा, नाहीतर थेट मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा; मग मी दाखवते महिलांना कसा न्याय मिळवून दिला जातो ते,” अशा शब्दांत त्यांनी स्वतःची दावेदारी जाहीर केली. यासोबतच, “सध्या मंत्रिमंडळात बसलेल्या अनेक आमदार-खासदार आणि पुढाऱ्यांचे वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त आहे, मात्र त्यावर कोणीही बोलत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली.
पुढाऱ्यांमधील अंधश्रद्धेवर केला प्रहार; गिरीजा राऊत यांची घेणार भेट
करुणा मुंडे यांनी राजकीय नेत्यांमधील अंधश्रद्धेवरही बोट ठेवले. “आजकाल प्रत्येक पुढारी हा तांत्रिक-मांत्रिकाच्या नादी लागलेला असतो. असा एकही आमदार, खासदार किंवा नगरसेवक नाही, ज्याचा संबंध भोंदू बाबांशी आलेला नाही,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात आपण विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यासह देशात सध्या सुरू असलेल्या आमदार-खासदार फुटीच्या राजकारणावरही त्यांनी उपरोधिक टिप्पणी करत सरकारला टोला लगावला.
विनायक राऊत यांनी आरोप फेटाळले; “माझा न्यायदेवतेवर विश्वास”
दुसरीकडे, खासदार विनायक राऊत यांनी आपल्या कुटुंबावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी रचण्यात आलेले हे एक मोठे षडयंत्र आहे. या षडयंत्राचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचे पुरावे मी आज देणार नाही; परंतु माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे आणि सत्य लवकरच समोर येईल,” अशी भूमिका विनायक राऊत यांनी मांडली आहे. या कौटुंबिक वादामुळे सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:48 13-07-2026














