चिपळूण : माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी नुकतीच रत्नागिरी येथे प्रशासकीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी चिपळूण येथे विमानतळासाठी जागा शोधण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने चिपळूण तालुक्यातील टेरव ग्रामपंचायतीने टेरव, धामणवणेमध्ये विमानतळासाठी जागा उपलब्ध आहे, असे पत्र खा. नारायण राणे यांना दिले आहे व याबाबत येथील सरपंच किशोर कदम हे नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पत्र लिहून विमानतळाच्या जागेसाठी सहकार्य केले जाईल, असे पत्र देणार आहेत.
खरेतर चिपळूण हे जिल्हाच काय तर संपूर्ण कोकणसाठी मध्यवर्ती केंद्र आहे. या ठिकाणी या आधीच विमानतळ होणे गरजेचे होते. मात्र, अनेक जागांचा प्रस्ताव समोर ठेवून हा प्रकल्प बारगळला. सुरुवातीच्या टप्प्यात लोटेमाळ, त्यानंतर रामपूर आणि टेरव-धामणमवणे अशा तीन जागा विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा चिपळूण या मध्यवर्ती ठिकाणी विमानतळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
टेरव ग्रा.पं.ने काही वर्षांपूर्वी टेरव व धामणवणे येथील माळरानावर विमानतळाचा प्रस्ताव शासनाला दिला होता. त्याच स्वरूपाचा प्रस्ताव टेरव ग्रामपंचायत देण्यास तयार आहे. माजी खा. स्व. गोविंदराव निकम, माजी आ. स्व. नानासाहेब जोशी व माजी सभापती कै. बाळासाहेब माटे यांच्या कार्यकाळात या ठिकाणी विमानतळ व्हावे अशी शिफारस करण्यात आली होती. त्यासाठी या लोकप्रतिनिधींनी जागेची पाहणी केली होती. आता पुन्हा नव्याने खा. राणे यांनी विमानतळाचा प्रस्ताव पुढे आणल्याने हा विषय चर्चेत आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 28/Dec/2024












