चिपळूण : रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाकडून चिपळूण तालुक्यात सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम ३ जानेवारीपर्यंत चालणार असून, शहरी व ग्रामीण भागातील घरांना भेटी देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्यांचे रोग निदान व क्षयरोगावरील औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत.
जोखीमग्रस्त गटामध्ये फुप्फुसाचा क्षयरोग असणारे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असून, डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळून आले आहे. परिणामी, संसर्गाची साखळी अखंडित राहण्यासाठी हे रुग्ण कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे निदान व औषधोपचारांपासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी ही मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या मोहिमेत आशा, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयरुग्ण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांचा सहभाग आहे. ते चिरेखाणीतील कामगार, वसतीगृह, वृद्धाश्रम, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, आब्यांच्या बागांमधील राखणदार, मजूर, औद्यागिक कामगार वसाहत, आदिवासी वाडीवस्ती, दुर्गम गावेवस्ती, ज्या गावात क्षयरुग्ण जास्त आहेत, बेघर, रस्त्यावरील मुले, अनाथआश्रम, मागील दोन-तीन वर्षांपासून क्षयरुग्णांच्या संपर्कात व सहवासात असलेली व्यक्ती, ६० वर्षापेक्षा जास्त व्यक्ती, धुम्रपान करणारे, मधुमेही यांची चौकशी करणार आहेत. या मोहिमेसाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांनी योग्य माहिती द्यावी तसेच आपला तालुका क्षयरोगमुक्त होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 28/Dec/2024












