गुहागर : गावचा विकास करताना आपल्याला येणाऱ्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे. यापुढेही करत राहीन. असगोली वरचीवाडी येथे पाणी समस्या भेडसावत आहे. नगराध्यक्ष असताना गुहागरमधील एक पाणीपुरवठा अखंडित राहण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न वरच्यावाडीची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी करेन, असे आश्वासन माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले.
तालुक्यातील असगोली वरचीवाडी येथे एकता वर्धक मंडळाच्या विद्यमाने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाला कुणबी समाज संघटना गुहागर असगोलीचे अध्यक्ष राजेंद्र भागडे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजय घुमे, प्रदीप घुमे, सुदाम घुमे, प्रियंका घुमे, उमेश कावणकर, सदानंद घुमे, पांडुरंग उदेग, आदी उपस्थित होते. याप्रसंगी नमन लोककला संस्थेच्यावतीने नमन लोककलेचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
यावर्षीचा लोककला प्रेरणा पुरस्कार श्री भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळ व शारदा कलापथक यांचे शाहीर प्रमोद घुमे यांना जाहीर झाला आहे. ५ जानेवारीला उद्योगमंत्री उदय सामंत आणि हास्यजत्रा फेम अभिनेते ओंकार भोजने यांच्या हस्ते इंदिरा सांस्कृतिक भवन चिपळूण येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याबद्दल एकता वर्धक मंडळातर्फे या मंडळाचे सदस्य असलेल्या प्रमोद घुमे यांचा सत्कार राजेश बेंडल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बेंडल म्हणाले, एकता वर्धक मंडळ हे दरवर्षी समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबवत असते. या मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी दिनदर्शिका प्रकाशित केली. मुंबई आणि असगोलीतील ग्रामस्थांमध्ये समनव्य साधण्याचे काम चांगल्या पद्धतीने केले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 28/Dec/2024












