पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची विविध तालुक्यांतील शाळांमध्ये नियुक्ती; एसआयआर व बीएलओ कामांच्या जबाबदारीचेही निर्देश
Ratnagiri Urdu Teachers Adjustment: रत्नागिरी (पुढारी वृत्तसेवा) :
पटसंख्येअभावी जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील विविध शिक्षक अतिरिक्त ठरले होते. अशा रिक्त ठरलेल्या एकूण १४ उर्दू शिक्षकांचे अखेर विविध तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. या समायोजनानंतर संबंधित शिक्षकांनी तातडीने नियुक्त केलेल्या शाळांमध्ये हजर व्हावे, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैदेही रानडे यांनी दिले आहेत.
अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत समायोजन
राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील पदवीधर शिक्षक व उपशिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरले होते. या १४ शिक्षकांचे नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करण्यात आले आहे.
शिक्षिका व शिक्षकांचे समायोजन झालेल्या शाळा
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना खालील शाळांमध्ये समायोजित करण्यात आले आहे:
- जि. प. शाळा घाटिवळे, उर्दू (ता. संगमेश्वर)
- जि. प. शाळा पिंपळी, उर्दू (ता. चिपळूण)
- जि. प. शाळा अंजनवेल, उर्दू (ता. खेड)
- जि. प. शाळा पडवे, उर्दू (ता. गुहागर)
- जि. प. शाळा कडवई, उर्दू (ता. संगमेश्वर)
- जि. प. शाळा पोफळी, उर्दू (ता. चिपळूण)
- जि. प. शाळा पोफळी, उर्दू (चिपळूण)
- म्हामुरवाडी (ता. रत्नागिरी)
- हर्णे, उर्दू (ता. दापोली)
- वाघिवरे, उर्दू (ता. चिपळूण)
- सवेणी, उर्दू (तालुका खेड)
- गोवळकोट, उर्दू (ता. चिपळूण)
- पाचल, उर्दू (ता. राजापूर)
“पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक विभागातील उर्दू माध्यमातील १४ शिक्षकांचे समायोजन नुकतेच करण्यात आले आहे. ते सर्व शिक्षकांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”
– दीपक मेंगाने, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. रत्नागिरी
शिक्षकांनी एसआयआर व बीएलओची कामे वेळेत करावीत
समायोजित झालेल्या शिक्षंपैकी ज्या शिक्षकांची नियुक्ती जनगणना, एसआयआर (SIR) किंवा बीएलओ (BLO) कामांसाठी झालेली आहे, अशा शिक्षकांनी समायोजित केलेल्या शाळेत हजर होऊन आपल्या मूळच्या जनगणना, एसआयआर व बीएलओच्या आदेशित कार्यक्षेत्रातील कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे निर्देशही सीईओ वैदेही रानडे यांनी दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 23-07-2026














