Ratnagiri Power Cut News: रत्नागिरीत थकबाकी वसुलीमुळे महावितरणची देखभाल-दुरुस्ती रखडली; दर सोमवारी ५ ते ६ तास वीज खंडित

तांत्रिक कर्मचारी वसुलीच्या कामात व्यस्त असल्याने आठवड्याची प्रलंबित कामे सोमवारी एकत्र; नागरिक, व्यापारी व उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी

Ratnagiri Power Cut News: रत्नागिरी (पुढारी वृत्तसेवा) :

महावितरणचे तांत्रिक कर्मचारी थकबाकी वीजबिल वसुलीच्या कामात गुंतल्याने दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे खोळंबली असून, याचा थेट फटका रत्नागिरी शहरातील वीज ग्राहकांना बसत आहे. आठवडाभर प्रलंबित राहिलेली देखभाल-दुरुस्तीची कामे दर सोमवारी एकत्रितपणे हाती घेतली जात असल्याने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा सलग ५ ते ६ तास बंद ठेवावा लागत आहे.

वरिष्ठ स्तरावरून वसुलीचे आदेश आणि यंत्रणेवरील ताण

महावितरणवर वीज निर्मिती कंपन्यांना नियमित देयके अदा करण्याचा मोठा ताण असल्याने थकबाकी वसुली वेगाने करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. परिणामी अभियंत्यांपासून ते तांत्रिक कर्मचाऱ्यांपर्यंत संपूर्ण यंत्रणा वसुली मोहिमेत गुंतली आहे. कर्मचाऱ्यांना दिवसभर ग्राहकांकडे जाऊन थकबाकी वसूल करणे किंवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने, नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वीजपुरवठा खंडित

आठवडाभरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दर सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. या वेळेत शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी, उद्योग तसेच कार्यालयीन कामकाजावर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

एकाच दिवशी कामांचा डोंगर

सोमवारी एबी स्विचची देखभाल, जंम्प बाइंडिंग, ऑइलिंग, ग्रीसिंग, ट्रान्सफॉर्मरची देखभाल, तुटलेले स्टे जोडणे, सैल झालेल्या ओव्हरहेड वीजवाहिन्या ताणणे, जळालेले फ्यूज बदलणे आणि डीपी बॉक्सची दुरुस्ती यांसारखी विविध कामे केली जातात. मात्र, ही कामे रोजच्या रोज नियमितपणे होत नसल्यामुळे सोमवारी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित ठेवावा लागत असल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 23-07-2026