Rajapur Athawada Bazar News: राजापुरातील आठवडा बाजार पूर्वीप्रमाणेच भरणार! भाजप सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी

गुरुवारचा आठवडा बाजार सुरळीत भरवण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते राहणार उपस्थित

Rajapur Athawada Bazar News: राजापूर :

राजापूर शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करत, आठवडा बाजार मागे हटवून व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासन व लोकप्रतिनिधी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या गुरुवारी भरणारा आठवडा बाजार पूर्वीप्रमाणेच भरेल आणि भारतीय जनता पार्टी सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा इशारा भाजपचे ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस अनिल करगुटकर व सुशांत मराठे यांनी दिला आहे. या संदर्भात भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच राजापूर पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

एका व्यक्तीच्या वादावरून बाजार हटवण्याचा प्रयत्न

शहरातील शिवाजीपथ मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून आठवडा बाजार भरत आहे. मात्र, एका व्यक्तीच्या वादावरून आणि सांगण्यावरून हा बाजार मागे हटवण्याचे प्रयत्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वैशंपायन गुरुजी पुलापासून ते नवजीवन हायस्कूलपर्यंत आठवडा बाजार भरतो. परंतु, प्रशासनाला केवळ वैशंपायन गुरुजी पुलापासून गणेश घाटापर्यंतच वाहतूक कोंडी झालेली दिसते का, त्याच्या पुढे वाहतूक कोंडी होत नाही का, असा रोखठोक सवालही भाजपने उपस्थित केला आहे.

इतर ठिकाणच्या वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

शिवाजीपथ मार्गावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असते. याशिवाय जवाहर चौक ते जकातनाका दरम्यान पोलीस ठाणे, कोर्ट आणि जवाहर चौक परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते, ती प्रशासनाला दिसत नाही का? केवळ आठवड्यातून एक दिवस भरणाऱ्या आठवडा बाजारातीलच वाहतूक कोंडी प्रशासनाला कशी दिसते, असा थेट सवाल शिष्टमंडळाने विचारला आहे.

खासदार, पालकमंत्री व आमदारांकडे मांडणार व्यथा

आठवडा बाजारातील व्यापारी, ग्राहक व नागरिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचा हा प्रयत्न असून तो हाणून पाडला जाईल. या गुरुवारचा आठवडा बाजार पूर्वीप्रमाणेच भरेल. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः बाजारात उपस्थित राहून व्यापाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देतील, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. तसेच, याप्रकरणी खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांच्या अडचणी व व्यथा मांडणार असल्याचेही शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 23-07-2026