Ratnagiri College Educational Tour: भारत शिक्षण मंडळाच्या ‘देव, घैसास, कीर’ महाविद्यालयाची नाचणे हवामान केंद्राला शैक्षणिक भेट

भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी घेतली प्रात्यक्षिकांची माहिती; हवामान अंदाज प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेत समजून घेतल्या संकल्पना

Ratnagiri College Educational Tour: रत्नागिरी :

येथील भारत शिक्षण मंडळ संचालित देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल विभागामार्फत नाचणे येथील हवामान केंद्राला शैक्षणिक भेट (Field Visit) देण्यात आली. या शैक्षणिक भेटीत प्रथम आणि तृतीय वर्षाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

उपकरणांची माहिती आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक

या अभ्यासात्मक भेटी दरम्यान हवामान केंद्रातील तज्ज्ञ अधिकारी राजेश सोनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी तापमापक, पर्जन्यमापक, वायुदाबमापक, तसेच वाऱ्याचा वेग आणि दिशा मोजणाऱ्या विविध उपकरणांची माहिती व त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले. या माध्यमातून हवामानविषयक माहितीचे संकलन, त्याचे विश्लेषण आणि अंतिम अंदाज तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

भूगोल विषयाची आवड आणि संकल्पना स्पष्ट

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना हवामानशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने समजण्यास मदत झाली, तसेच विद्यार्थ्यांची भूगोल विषयातील आवड अधिक द्विगुणित झाली.

उपक्रमाचे नियोजन

या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या भूगोल विभाग प्रमुख प्रा. ऋतुजा भोवड आणि सहायक प्रा. वैष्णवी शेवडे यांनी केले होते. या संपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:00 23-07-2026