उद्धव ठाकरेंनी घेतला रत्नागिरी विधानसभेचा आढावा

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी रत्नागिरीतील इच्छुक उमेदवारांनाही त्यांनी प्रश्न विचारून तयारीची माहिती घेतली. यावेळी जनशक्तीचा विजय होईल, असा विश्वास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी ठाकरेंसमोर व्यक्त केला.

शिवसेना उबाठाच्या वतीने पक्षप्रमुखांनी कोकणातील विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक विधानसभेसाठी पंधरा मिनिटे देऊन मतदारसंघातील पक्षाकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. त्याचवेळी विरोधकांची मतदारसंघातील शक्तीबाबतही विचारणा केली. रत्नागिरीतील धनशक्तीसमोर कसे उभे राहणार असा थेट प्रश्न उध्दव ठाकरे यांनी माजी उपाध्यक्ष उदय बने यांना केला, त्यावेळी बने यांनी जनशक्ती सोबत असून, धनशक्तीचा पराभव निश्चित करू, असा विश्वास व्यक्त केला.

यापूर्वी वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून आपण निवडून आलो. या प्रत्येक वेळी धनशक्तीच विरोधात होती. मात्र, जनशक्ती आपल्या पाठिशी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काही इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपण माघार घेतल्याचेही ठाकरे यांच्यासमोर सांगितले. यावेळी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व इच्छुक उदय बने, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 30/Sep/2024