NEET Exam Cancelled: कठोर मेहनतीवर पाणी फेरले.. ‘नीट’ परीक्षा रद्दमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला

मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईसह राज्यभरातील पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले नाही, तर अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटकाही सोसावा लागला आहे.

सुट्ट्यांचे नियोजन कोलमडले; ७ ते ८ लाखांचा फटका

दोन वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर तणावमुक्त होण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी परदेश दौरे किंवा सहलींचे नियोजन केले होते. मुंबईतील पालक राहुल राजगढिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीने डॉक्टर होण्यासाठी अथक मेहनत घेतली होती. परीक्षा संपल्यानंतर त्यांनी परदेशात जाण्यासाठी विमान तिकिटे आणि हॉटेल बुकिंग केले होते. मात्र, आता फेरपरीक्षेमुळे हा बेत रद्द करावा लागला आहे. “आम्ही ‘नॉन-रिफंडेबल’ तिकिटे बुक केल्यामुळे जवळपास ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे,” असे त्यांनी हताशपणे सांगितले.

विद्यार्थिनीची व्यथा: “१५ तासांचा अभ्यास वाया गेला”

६८८ गुण मिळण्याची अपेक्षा असलेल्या परिधी राजगढिया या विद्यार्थिनीने आपली व्यथा मांडली. “गेल्या सहा महिन्यांपासून दिवसातील १५ तास अभ्यास केला होता. पेपरही सोपा गेला होता, पण आता सर्व प्रयत्न वाया गेल्यासारखे वाटत आहेत. मोठ्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही, याचे दुःख आहे,” असे परिधीने सांगितले.

‘नीट’ परीक्षा ऑनलाइन घ्या; तज्ज्ञांची मागणी

वारंवार होणारी प्रश्नपत्रिका फुटी रोखण्यासाठी आता ही परीक्षा ‘कॉम्प्युटर बेस्ड’ म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेण्याची मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे.

  • ऑनलाइन पद्धतीचा फायदा: आयआयटीसाठीची ‘जेईई’ (JEE) आणि राज्याची ‘सीईटी’ (CET) या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातात, जिथे पेपर फुटीची शक्यता नगण्य असते.
  • सरकारी परीक्षा केंद्रे: नीट परीक्षेसाठी खाजगी केंद्रांऐवजी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून देशात ‘डेडिकेटेड’ सरकारी परीक्षा केंद्रे उभारावीत, अशी मागणी समुपदेशक सचिन बांगड यांनी केली आहे.

प्रशासनावरील विश्वास धोक्यात

शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. “स्पर्धा परीक्षांवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि भवितव्य लक्षात घेऊन अधिक जबाबदारीने निर्णय घ्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नेमकी अडचण कुठे?

सध्या नीट परीक्षा लेखी स्वरूपात होते. यासाठी प्रश्नपत्रिका जयपूर किंवा इतर ठिकाणच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये आधीच छापल्या जातात. तिथून त्या देशभरात पाठवताना फुटण्याची भीती असते. ऑनलाइन परीक्षेत थेट परीक्षेच्या वेळी संगणकावर प्रश्नपत्रिका उपलब्ध होत असल्याने हा धोका टळू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 13-05-2026