गुहागर : गणेशोत्सवापासून अचानक बदललेल्या वातावरणामुळे दाभोळ बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. दोन दिवसांपूर्वी काही मच्छीमारांनी आपल्या नौका मासेमारीसाठी समुद्रात लोटल्या आहेत. परंतु, परतीच्या पावसाने वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांनी मासेमारी थांबवली. त्यामुळे आता बंदर गजबजायला अजून एक आठवडा जाण्याची शक्यता आहे. सुमारे तीन आठवडे मासेमारी बंद झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.
शासनाच्या नियमानुसार १ ऑगस्टपासून चालू झालेल्या मासेमारी उद्योगाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली होती. मासळी बंपर मिळू लागली होत. परंतु बहुतांशी मासळीचे गेल्या वर्षपिक्षा यावर्षी ५० टक्क्यांनी दर घसरले होते. तरीही किमान ३०० ते ४०० नौका यावेळी मासेमारीला समुद्रात उतरल्या होत्या. किमान दोन आठवडे चांगले गेले आणि ऑगस्ट महिन्यात पुन्हा वादळाने तोंड वर काढले. त्यामुळे किमान ८ ते १० दिवस मासेमारी थांबली होती. पुन्हा वातावरण शांत झाल्यानंतर मासेमारीला सुरुवात झाली. त्यानंतर ती ६ सप्टेंबरपासून थांबली. गणेशोत्सवातही मासेमारी उद्योगच बंद होता.
दाभोळ मासेमारी उद्योग बंदमुळे रोजची मासळी विक्रीतून होणारी लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे. गणेशोत्सवासाठी खलाशी सुट्टी घेतात. परंतु उत्सव संपल्यावर मासेमारी लगेच चालू होणार होती. मात्र, वादळामुळे थांबलेली मासेमारी आता चालू व्हायला अजूनही तीन ते चार दिवस लागतील.
गणेशोत्सवानंतर सुमारे १०० नौका मासेमारीला समुद्रात उतरल्या होत्या. काही लोकांची तयारी सुरू होती तर काही लोकांचे नाखवा खलाशांच्या शोधात आहेत तर काहीजण मासेमारी सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ नसल्याने समुद्रात मासेमारीला उतरायचे थांबले आहेत.
आणखी दोन तीन दिवस असेच जाणार
नुकत्याच पार पडलेल्या अनंत चतुर्दशीनंतर मासेमारीला सुरुवात होणार होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांत परतीच्या पावसाने जोर केला आहे. तसेच ३५ ते ४० कि. मी. वेगाने वारे देखील वाहत आहेत. अशी ही परिस्थिती किमान अजून दोन दिवस असण्याची शक्यता मच्छीमारांनी वर्तवली आहे. त्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. वातावरण शांत झाल्याशिवाय मासेमारीला नौका जाणार नाही. अजूनही दोन ते तीन दिवस तरी मच्छीमारांना शांतच बसावे लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 30/Sep/2024