गोदूताई जांभेकर विद्यालयाचा शतक महोत्सव | मालतीबाई व बाबुराव जोशी यांनी पेटवली स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

रत्नागिरी : कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी सामाजिक सेवेसाठी शिक्षण क्षेत्र निवडले. तत्कालीन सामाजिक व्यवस्थेत चूल आणि मूल या चौकटीत बंदिस्त, गुरफटलेल्या स्त्रीला मुक्त करण्यासाठी या दांपत्याने स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आणि र.ए. सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केले.

येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचालित गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या शतक महोत्सव समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, मालतीबाई व बाबुराव जोशी यांचे प्रयत्न आज निश्चितपणे फळाला आले आहेत. आज ही संस्था समाज कसा घडवला पाहिजे हा विचार घेऊन काम करत आहे. ज्यांनी ज्यांनी या संस्थेत निःस्वार्थपणे सेवा केली त्यांच्या मदतीनेच हे कार्य चालू आहे. गेल्या वर्षभरात संस्थेची झालेली प्रगती विलक्षण आहे. कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी नीराबाई हेगडे, चंद्राबाई देशपांडे आणि सोनू देशपांडे तीन मुलींना घेऊन १ जानेवारी १९२५ रोजी शाळा सुरू केली. ही ऐतिहासिक घटना आहे. तापलेल्या वाळूत पाय पोळावेत आणि अपमान पदरात घेऊन केवळ लोकसेवेसाठी स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जोशी दांपत्य आहे.

ते पुढे म्हणाले की, माजी विद्यार्थी अनिल तोरगलकर यांनी दिलेल्या पाच कोटी रुपयांच्या देणगीतून महाविद्यालय इमारत, रमा पुरुषोत्तम फाउंडेशन (पुणे) यांच्या रूपाने ८ कोटी ३५ लाख देणगीतून विद्यार्थिनी वसतिगृह आणि पीएम उषा योजनेतर्गत पाच कोटी अनुदानातून कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत नवीन बांधकाम व महाविद्यालय मुख्य इमारत दुरुस्ती नूतनीकरण अशी एकाच वेळी बांधकामे सुरू आहेत. शिल्पाताई व सर्व पदाधिकारी, सहकारी चांगले काम करत आहेत.

कार्यक्रमाला कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद जोशी, उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र मलुष्टे आणि जोशी, जांभेकर कुटुंबातील प्रज्ञा जांभेकर, नीता जांभेकर, विजय जांभेकर, डॉ. माधुरी लोकापूर, गिरीश जोशी, सुनंदा पटवर्धन, मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. राजेंद्र मलुष्टे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पुस्तकी अभ्यासासोबतच मुलांमधील कौशल्यांचा विकास करत सामाजिक मूल्य जपणारी आदर्श नागरिकांची पिढी घडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना विविध समाजघटकांनी आणि शासनाने साथ द्यावी.

उपाध्यक्ष व बाबुराव जोशी यांचे नातू डॉ. मुकुंद जोशी यांनी यावेळी मालती – जनार्दन पुरस्कार जाहीर केला. सामाजिक, शैक्षणिक कार्य करणारी एक स्त्री आणि एका पुरुषाला हा पुरस्कार देण्यात येईल. डॉ. नीला जोशी लिखित देखणी ती पाऊले या जोशी दांपत्याच्या चरित्राचा इंग्रजीतून अनुवाद प्रकाशित करू, असेही घोषित केले.

शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे आणि बाया व महर्षी कर्वे यांच्याकडून प्रेरणा घेऊन मालतीबाईंनी रत्नागिरीत स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. महिला विद्यालयाचे नामकरण गोदूताई जांभेकर विद्यालय असे करण्यात आले. या गोदूताई यांनीदेखील चौथी इंग्रजीच्या शिक्षणानंतर नर्सिंगचा कोर्स करून साडेतीन हजार महिलांवर विनामोबदला उपचार केले. फक्त पदवी शिक्षण घेऊन नव्हे, तर मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काय करता येईल असा प्रयत्न संस्था करणार आहे. कौशल्य विकासाकरिता संस्था येथे नवा प्रकल्प सुरू करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 02-01-2025