चिपळूण : येथील पालिकेने वाढीव घरपट्टीची आकारणी केल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. सुमारे ६४०६ घरपट्टी मालकांची घरपट्टी व झोन योग्य करण्यात आले, अशी माहिती शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी दिली.
या सुनावणीत ४३२६ नागरिकांचे बांधकाम वर्ष तपासणी करून योग्य करण्यात आले आहे. सर्व्ह करणाऱ्यांनी बांधकाम वर्ष नोंद चुकीची केली होती. डोंगराळ भागातील काही नागरिकांना झोन एक किंवा दोनप्रमाणे घरपट्टी आकारण्यात आली होती. ती आता झोन चारप्रमाणे घरपट्टी आकारण्यात येणार आहे. २०८० घरपट्टीधारकांना झोन योग्य केल्याने न्याय मिळाला आहे.
ठेकेदार पद्धतीने घरांच्या केलेला सर्व्हेमध्ये त्यांनी चुकीचे बांधकाम वर्ष नोंदवले होते, ते तपासून योग्य करण्यात आले आहे याशिवाय व्यापारी दुकानाच्या पोटमाळाबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले हे राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहेत. त्यात पूरपरिस्थितीमुळे पोटमाळाबाबत घरपट्टी पूर्ण माफ करावी किंवा ५० टक्के आकारावी याबाबत मार्गदर्शन घेणार आहेत, तसेच गुरांच्या गोठ्याबाबतही योग्य आकारणी होणार आहे.
उबाठाने सुरुवातीपासून आंदोलन नियोजनबद्ध केले. नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक कलकुत्तकी यांच्याकडे जनतेवर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली. काही पुरावे सादर केले. त्यानंतर घरपट्टीबाबत नागरिकांना अपेक्षित न्याय मिळाला, अशी माहिती शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी दिली. फेरमोजणीनंतर काही घरपट्टीधारकांना न्याय मिळणार आहे, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 02/Jan/2025














