…तर आ. शेखर निकम यांना ५० हजारांचे मताधिक्य मिळाले असते : जाकीर शेकासन

आरवली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार शेखर निकम यांचे मताधिक्य कमी झाल्याचे दिसत असले तरी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले २० हजाराचे मताधिक्य कापण्यात आमदार शेखर निकम यांना यश आले. याचा विचार केला तर ५० हजाराचे मताधिक्य आमदार शेखर निकम यांना मिळाले असते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी केला आहे.

दि. १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात अल्पसंख्याक बूथ समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात मोहीम रबावण्यात येत आहे. अल्पसंख्याक बहुल वस्तीमधील विकासकामांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास कामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे जाकीर शेकासन यांनी सांगितले. लवकरच अल्पसंख्याक खात्याचे मंत्री ना. दत्ता भरणे यांना भेटून रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांचा आराखडा त्यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

गेल्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून मुस्लिम, दलित अल्पसंख्याक समाजात गैरसमज पसरवण्यात आले. तरीही या समाजाने महायुतीच्या उमेदवारांना निर्णायक मतदान केले. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांचे मताधिक्य २०१९ च्या निवडणुकीपेक्षा घटले, ही वस्तुस्थिती असली तरी सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात २० हजाराचे मताधिक्य मिळाले होते.

२० हजाराचे मताधिक्य सहा महिन्यात आमदार शेखर निकम यांनी कापून विजय मिळविला हे आमदार शेखर निकम यांचे कौशल्य आहे. याचा विचार केला तर आमदार शेखर निकम यांना ५० हजाराचे मताधिक्य मिळाले असते, असे जाकीर शेकासन यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 02/Jan/2025