रत्नागिरी : शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार बाळ माने यांची कोणतीही भेट झालेली नाही. तशी काही माहितीही नाही. बाळ मानेंच्या ठाकरे भेटीची शक्यता भाजपा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी फेटाळून लावत आगामी विधानसभेला पक्ष जो आदेश देईल आणि महायुतीचा जो उमेदवार असेल, त्याचे काम प्रामाणिकपणे भाजपा कार्यकर्ते करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, बाळ माने यांनी मुंबईतून रत्नागिरीत आल्यानंतर जिल्हा कार्यालयात थांबून तीन तास त्यांनी पक्षाच्या कामात सहभाग घेतला व कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २००४ पर्यंत ते आमदार होते. त्यानंतर ते सामाजिक काम करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कामही ते जोमाने करीत आहेत.
मागील पाच वर्षांत त्यांना राज्य पातळीवर एखादे पद मिळेल किंवा विधान परिषदेवर त्यांना घेतल जाईल, अशी भाजपा कार्यकत्यांची अपेक्षा होती. त्यांना पद मिळाल्यास दक्षिण रत्नागिरीमध्ये पक्षालाही वळकटी मिळेल, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती; परंतु अद्याप तसे काही घडले नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
मागील अनेक वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करून देश व राज्य पातळीवरील महायुती आणि भाजपाचे पदाधिकारी त्यांचा नक्की विचार करतील, अशी आशा भाजपा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, राज्यात युती असतानाही युतीतील मित्रपक्षांकडून स्थानिक भाजपा कार्यकत्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. आता काही कार्यक्रमांना बोलावले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, महायुतीचा उमेदवार जाहीर होईल, तो शिवसेनेचा असो की भाजपाचा, तो उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रामाणिक काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 30/Sep/2024