रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगला देशात जन्म झालेल्या व्यक्तीने जन्मदाखला मिळवल्याबाबतची चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या ग्रामपंचायतीतील संबंधित तत्कालीन सरपंचासह, ग्रामसेवक व इतर कर्मचारी वर्गाला नोटीस देऊन मुंबई पोलिसांनी चौकशीला बोलावले जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, घुसखोरी करून आलेल्या बांगला देशींकडूनच नव्हे तर इतर राज्यातून आलेल्यांकडून रत्नागिरीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जन्मदाखले मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. शुक्रवारी ता. ३ रोजी झारखंड येथील दोन तरुण रत्नागिरी नगर परिषदेत येऊन जन्मदाखला काढून मिळेल का, अशी विचारणा करत होते.
रत्नागिरी तालुक्यात अनेक मोठमोठ्या कंपन्या असून, त्याठिकाणी परप्रांतीय आणि बांगला देशी कामगार वर्ग आहे. या परराज्यातील काही कामगारांकडून रत्नागिरीत जन्म झाल्याचा दाखला मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. अशातच शुक्रवारी झारखंड राज्यातील दोन तरुण रत्नागिरी नगर परिषदेत येऊन जन्मदाखला काढून मिळेल का, याबाबत चौकशी करीत होते. त्यातच आता तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने बांगला देशात जन्मलेल्याला स्थानिक जन्मदाखला दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बांगला देशी नागरिकाला खोटा जन्मदाखला बनवून दिल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसह तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांची मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांकडे काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे असून याची चौकशी सुरु असल्याचे वृत्त आमच्याही कानावर आले असून या विषयी कोणतीही माहिती रत्नागिरी पोलिसांना नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीसांनी दिली.
दरम्यान, संबंधित जन्म दाखला घेणाऱ्याने तो १ मे १९८३ रोजी जनमला असल्याची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीने त्याला हा दाखला २०२० रोजी दिला गेला असल्याची बाब आता उघड झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनीही चौकशीला बोलावले : शिरगावचे तत्कालीन सरपंच, उपसरंपच तसेच ग्रामसेवक यांची मुंबई पोलिसांनी या गंभीर प्रकारासंदर्भात चौकशी केली असून सोमवारी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी देखील रात्री उशिरा संबंधितांना बोलावून चौकशी केली.
दाखला नजरचुकीने दिल्याची ग्रा.पं.ची कबुली
या प्रकरणा संदर्भात मुंबई पोलिसांनी आमची चौकशी केली असून ग्रामपंचायतीची देखील चौकशी केली आहे. संबंधित जन्मदाखला हा नजरचुकीने देण्यात आला असून, यामध्ये जाणूनबुजून कुणीही काहीही केले नाही, असे शिरगाव ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
संबंधितांवर होऊ शकतो देशद्रोहाचा गुन्हा ?
रत्नागिरी तालुक्यातील एका मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार त्यामुळे उघड झाला आहे. मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये एका गुन्हयात पकडलेल्या मूळ बांगलादेशी नागरिकाच्या चौकशीमध्ये त्याच्याकडे रत्नागिरीतील जन्मदाखला असल्याची माहिती उघड झाली आहे. बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिल्याप्रकरणात देशद्रोहाचाही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 07/Jan/2025














