रत्नागिरी : पावसाळ्यात कोकणात साप दिसण्याचे किंवा बाहेर पडण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे या कालावधीत सर्पदंशाचे प्रमाणही वाढते. गेल्या वर्षभरात जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे ७९३ रुग्ण दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९९.७ टक्के इतके असून मृत्यूचे प्रमाण ०.३ टक्के आहे.

पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने संरक्षणासाठी साप बाहेर पडतात तसेच बेडूक या भक्ष्यासाठीही साप बाहेर पडतात. त्यामुळे या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. ग्रामीण भागातील काहीठिकाणी सापांना पकडून त्यांचा खेळ केला जातो. यासाठीही कडक शिक्षा आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात विंचूही मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे या कालावधीत विंचूदंशांच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते. रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ७९३ सर्पदंशाचे रुग्ण होते. त्यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उन्हाळ्याच्या हंगामात गारव्यासाठी रात्री साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. जून महिन्यात बिळात पाणी शिरल्यामुळे किंवा बेडूक, उंदीर या भक्ष्यासाठीही साप बाहेर पडतात. त्यामुळे जून महिन्यात सापांचे प्रमाण अधिक दिसते. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप म्हणाले, पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते; मात्र, सर्पदंश झाल्यास रुग्णाला धीर द्या. ओळखीसाठी सर्पाला मारण्यात किंवा शोधाशोध करण्यात वेळ न घालवता रुग्णालयात दाखल करा. त्यामुळे तातडीने उपचार होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 07/Jan/2025














