रत्नागिरीच्या समुद्रात मलपी मासेमारी नौकांचा हैदोस

रत्नागिरी : रत्नागिरीच्या समुद्रात तामिळनाडूच्या मलपी वेगवान मासेमारी नौकांनी हैदोस मांडला आहे. समुद्राच्या तळापासून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंतचा मासा अक्षरशः खरवडून नेला जात आहे. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. परप्रांतीय नौका अशा प्रकारे मासा मोठ्या प्रमाणात जाळ्यात पकडून नेत आहेत. परंतू स्थानिक पातळीवर मासे मिळण्याच्या मुद्यावर पारंपरिक मच्छीमार पर्ससीननेट मासेमारीवर उंगलीनिर्देश करत आहेत. या परप्रांतीय नौकांना आवरणे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेलाही जड जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. स्थानिक मच्छीमार नौकांच्या मासेमारीवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आहेत. मासळी मिळतच नसल्याने सन 2021 -22 च्या तुलनेत गेल्यावर्षी तब्बल 416 नौका कमी झाल्या. नौका कमी होवूनही त्यांना मासळी मिळण्याचा रिपोर्टही फारच कमी होता.

सन 2021-22 च्या तुलनेत गेल्या वर्षी तब्बल 38 हजार 511 मे. टन ने मासळी कमी मिळाली. जिल्ह्यात 2520 मच्छीमार नौका आहेत. पारंपरिक नौकांसह यातील पर्ससीननेट नौकांना सुद्धा मासळी कमी मिळाली. यातून पर्ससीननेट आणि पारंपारिक मच्छीमारांमध्ये दरवर्षी वाद होतात ते आजही सुरुच आहेत. परंतू मासळी कमी मिळण्याचे प्रमाण परप्रांतीय मलपी नौकांमुळे होत आहे, याकडे कुणाचेच लक्ष नाही.

सहाय्यक मत्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने काही दिवसांपूर्वी या तामिळनाडूच्या मलपी नौकांचा रत्नागिरीतून गणपतीपुळेपर्यंत पाठलाग केला, परंतू गस्ती नौकेचा वेग कमी असल्याने काहीच कारवाई होवू शकली नाही. सागरी सुरक्षा पोलिस, कस्टम आणि तटरक्षक दलाने या तामिळनाडूच्या मासेमारी नौकांकडे लक्ष देणे, गरजेचे झाले आहे.

Khabardar diwali fest

रत्नागिरीच्या समुद्रात या वेगवान नौका राज्याच्या सागरी क्षेत्रापर्यंत येवून मासेमारी करत आहेत. काही वेळेला स्थानिक मच्छीमार त्यांना समुद्रात अटकवण्याचा प्रयत्न करतात. परंतू, आजुबाजूला मासेमारी करणार्‍या मलपी नौकांना वायरलेसवरून कळविल्यानंतर त्या स्थानिक नौकेला घेरतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांची ताकदही कमी पडत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 07-01-2025