कोसुंब येथील सचिन कोवळे यांची रॉक्सी श्वान आळवते चक्क हनुमान चालीसा!

देवरुख : श्वान म्हटले की, त्यांचे भुंकणे, चावणे व त्याच्यातील तो चिडखोरपणाच डोळ्यासमोर येत असतो. पण कुणी कधी हनुमान चालीसा गुणगुणारे श्वान पाहिलेय ? होय… चक्क हनुमान चालीसा आळवणारे श्वान पाहून कुणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या श्वान मादीसमोर हनुमान चालीसा मोबाईल लावल्यास ती हनुमान चालीसा आळवताना पाहाला मिळते. तिचा तो गोड स्वर ऐकून पाहणारा प्रत्येकजण थक्क होत आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब या येथील सचिन कोवळे यांची ही पाळलेली रॉक्सी चालीसा आळवून पाहणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावते. रॉक्सी ही रॉटविलर जातीचे श्वान आहे. कोवळे यांनी तीन वर्षांपूर्वी केवळ ३० दिवसांची असताना तिला पाळण्यासाठी आणली. रॉक्सी कोवळे कुटुंबियांसाठी अत्यंत मायाळू म्हणून आहे. मात्र, परकी व्यक्ती घर परिसरामध्ये आल्यास त्यांच्यावर तुटून पडण्यासाठी तयार असते.

खरे तर श्वानामधील अत्यंत चिडखोर अशी ही जात असते. एखाद्याचा चावा घेतल्यास तोंडात आलेला सर्व मांसल भाग खेचूनच घेते. म्हणूनच तिच्यासाठी कोवळे यांनी लोखंडी पिंजरा घर म्हणून तयार केला आहे. रॉक्सीसमोर कोणतेही भक्तीगीत, भावगीत, चित्रपट गीत व अन्य हनुमान देवतांची गाणी मोबाईल वा स्पीकरवर लावल्यास ती त्याकडे दुर्लक्ष करते. मात्र संगीतमय हनुमान चालीसा लावल्यास त्या चालीसातील स्वर सुरू होण्याआधीच मधुर आवाजामध्ये रॉक्सी चक्क हनुमान चालीसा आळवते. हा प्रकार दिवसातून कितीही वेळा करा रॉक्सी न थकता हनुमान चालीसा आळवते. एरवी कर्कश्य आवाजामध्ये भुंकणारी रॉक्सी हनुमान चालीसा लावताच तिच्या आवाजामध्ये मधूर स्वर येतो.

हनुमान चालीसा आळणारी ही रॉक्सी पाहण्यासाठी अनेकजण कोवळे यांच्या घरी गर्दी करत असतात. अनेकजण हनुमान चालीसा आपल्या मोबाईलवर लावून त्याचा प्रत्ययही घेतात. रॉक्सी ही पूर्णपणे शाकाहारी आहे. तिच्या आहारामध्ये नियमित भात, भाजी, आमटी, चपाती याचाच समावेश असतो. रॉक्सीला ताक अत्यंत प्रिय आहे. कोवळे कुटुंबीयांबाबत ती अत्यंत हळवी आहे.

कोवळे कुटुंबामधील एखादी व्यक्ती आजारी असल्यास ती दिवसभर उपाशी राहते. याचबरोबर कुटुंबांमधील एखाद्या व्यक्ती तिच्यावर ओरडली तर ती अन्नत्याग करते. तिला मायेने जवळ केल्यावरच अन्नग्रहण करते असा तिचा गुण तिचे मालक कोवळे आवर्जून सांगतात. कोवळे यांच्या घरी रोज सकाळी हनुमान चालीसा लावली जाते. यावेळी पिंजऱ्यात असणारी रॉक्सी देखील हनुमान चालीसा आळवते. चालीसेमध्ये जसे स्वर वर खाली आहेत त्याप्रमाणे रॉक्सीही आपले स्वर वर-खाली करत असते. हनुमान भक्त असलेल्या या रॉक्सीचे सर्वांनाच कौतुक वाटते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 09/Jan/2025