Dhamapur Historical Ruins: धामापूर येथे सापडले प्राचीन राजवाड्याचे व मंदिराचे भग्नावशेष; पुरातत्त्वीय संशोधनाची मागणी

Dhamapur Historical Ruins: धामापूर येथे सापडले प्राचीन राजवाड्याचे व मंदिराचे भग्नावशेष; पुरातत्त्वीय संशोधनाची मागणी

चालुक्य ते शिलाहारकालीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या अवशेषामुळे संगमेश्वरचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणच्या ऐतिहासिक वैभवाचे अनेक समृद्ध ठेवे आजही काळाच्या पडद्याआड आहेत। संगमेश्वर तालुक्यातील धामापूर (पूर्वीचे धर्मपूर) येथे रानवेली आणि झाडाझुडपांच्या विळख्यात दडलेले प्राचीन राजवाड्याचे भग्नावशेष Dhamapur Historical Ruins तसेच मंदिराचे अवशेष समोर आले आहेत। गर्भगृहातील देखणी मात्र भग्न मूर्ती, प्राचीन बांधकामाचे अवशेष आणि स्थानिक शिमगोत्सवाशी जोडलेली राजघराण्याची परंपरा या परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देत आहे। चालुक्य ते शिलाहारकालीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या या वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण, उत्खनन आणि संवर्धन करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे।

११ व्या ते १३ व्या शतकातील शिल्पकलेचा प्रत्यय; मूर्तीचे देखणे रूप

धामापूरमधील ओढ्याच्या काठावर चिरे आणि विटांनी बांधलेल्या या वास्तूंचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत आढळतात। मंदिराचे बाह्य बांधकाम मोठ्या प्रमाणावर ढासळले असले, तरी गर्भगृह आजही अस्तित्वात आहे। या गर्भगृहात उभी असलेली प्राचीन मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते।

Shitit jyotish

मूर्तीच्या मस्तकावर उंच किरीट, कमरेला कंबरपट्टा आणि मांड्यांपर्यंत कोरलेले वस्त्र यांवरून तत्कालीन प्रगत शिल्पकलेचा प्रत्यय येतो। जरी या मूर्तीचे दोन्ही पाय गुडघ्याखाली भग्न झालेले असले, तरी तिचे शिल्पसौंदर्य आजही कायम आहे। मूर्तीमागील कमानदार चौकट आणि मुकुटाच्या रचनेवरून हा ठेवा साधारणतः ११ व्या ते १३ व्या शतकातील शिलाहार ते उत्तर यादव कालखंडातील असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे।

पुरातत्त्व विभागाच्या पाहणीची ग्रामस्थांना प्रतीक्षा

प्राचीन अपरांत भूमीतील संगमेश्वर हे धार्मिक आणि व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जायचे। सातव्या शतकातील चालुक्य राजवटीचा या परिसरावर प्रभाव असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत। निसर्गाच्या हिरव्यागार आवरणात लपलेला हा ऐतिहासिक ठेवा योग्य देखभालीअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे।

पुरातत्त्व विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून शास्त्रीय सर्वेक्षण, उत्खनन आणि संवर्धनाची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धामापूरचा हा विस्मृतीत गेलेला वारसा जतन झाल्यास कोकणच्या ऐतिहासिक पर्यटनाला निश्चितच नवी दिशा आणि उभारी मिळू शकेल।