रत्नागिरी : जिंदल पोर्टमधील दुर्घटनेनंतर अद्यापही समितीचा अहवाल पुढे आलेला नसतानाही, प्रशासनाने समितीमधील सदस्य असलेल्या ग्रामस्थांनाही अंधारात ठेवत परवानगी कशी दिली, असा प्रश्न आता जयगड ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थ शांत झाले असले तरी ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. यापुढे सनदशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये जिंदल पोर्टमधून होणार्या एलपीजी वाहतुकीदरम्यान वायुगळती होऊन जवळपास 80 हून अधिक मुलांना याची बाधा होऊन त्रास झाला होता. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना कमी- अधिक प्रमाणात त्रास होत आहे. कंपनीने या बाधितांना आतापर्यंत एक पैशाचीही मदत केलेली नाही.
राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी या घटनेबाबत चौकशी करण्यास समिती नेमली होती. अपर जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमली. यात काही ग्रामस्थांनाही स्थान दिले होते. परंतु, चौकशीचा अहवाल अद्याप आलेला नाही. चौकशीचे काय झाले, याची माहितीही पुढे देण्यात आली नाही.
या घटनेनंतर एलपीजी वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती; परंतु आता ही बंदी उठवण्यात आली असून, शुक्रवारपासून एलपीजी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. हा प्रकार कळल्यावर ग्रामस्थ जिंदलच्या गेटवर धडकले होते.
रात्री उशिरापर्यंत संतप्त ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न पोलिस यंत्रणेकडून सुरू होता. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांना ग्रामस्थांची समजूत काढण्यात यश आले. यानंतर ग्रामस्थांनी सनदशीर मार्गाने हा लढा लढण्याचा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारी रोजी जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलन करणार आहेत.
पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेसाठी एलपीजीची आवश्यकता
एलपीजी वाहतुकीसाठी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेचे कारण कंपनीकडून पुढे केले गेले असल्याची चर्चा शुक्रवारच्या आंदोलनादरम्यान सुरू होती. गॅस पुरवण्यासाठी जयगड गावातील ग्रामस्थांचे जीव गेले तरी प्रशासनाला चालणार आहे का, असा प्रश्नही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 13-01-2025














