रत्नागिरी : शहरातील भुतेनाका ते मांडवी असा काही महिन्यांपूर्वीच रस्ता करण्यात आला होता; परंतु महावितरण कंपनीने भूमिगत विद्युतवाहिन्यांच्या प्रकल्पाच्या नावाखाली पुन्हा एकदा हा रस्ता खोदला आहे. त्यामुळे पालिकेचे अर्थात रत्नागिरीकरांचे लाखो रुपये वाया गेले आहेत. भूमिगत विद्युतवाहिन्यांचे सुरुवातीला जेव्हा काम करण्यात आले तेव्हाच हे काम का केले नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत; परंतु केंद्र सरकारच्या सायक्लॉन योजनेअंतर्गत हे काम आहे.
खोदकाम केलेला भाग महावितरण कंपनी पुन्हा दुरुस्त करून देणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. वादळापासून किनारी भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, विद्युतखांब कोलमडणे, मुख्य वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडणे, असे अनेक प्रकार घडत होते. किनारी भागातील विद्युत ग्राहकांना पावसातही विनाखंडित सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनाने सायक्लॉन योजनेतर्गत भूमिगत विद्युतवाहिन्यांचा प्रकल्प हाती घेतला. प्रायोगिक तत्वावर रत्नागिरीच्या किनारपट्टीवर तो राबवण्यात आला होता. तो ९५ टक्के पूर्ण झाला असून, काही भागात भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्याचे काम राहिले होते. त्यानुसार शहरातील भुतेनाका ते मांडवीपर्यंत पुन्हा महावितरण कंपनीने गटार आणि रस्ता यांच्यामध्ये भूमिगत मुख्य वाहिनी टाकण्यासाठी खोदाई केली आहे. यामुळे वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेले गटार आणि दोन महिन्यांपूर्वी केलेला रस्ता पुन्हा खराब झाला आहे तसेच वाहतूककोंडीही होत आहे.
महावितरण कंपनीने सुरुवातीलाच हे काम का केले नाही? गटार आणि रस्त्याचे काम झाल्यानतंर ते खराब करण्यासाठी पुन्हा हे उद्योग सुरू केले आहेत काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. यामुळे कोटयवधीचा विकासकामाचा निधी वाया जात असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. याबाबत पालिका प्रशासनाला विचारले असता त्यांनी सांगितले की, केंद्र शासनाचा सायक्लॉन योजनेतर्गत हा प्रकल्प आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ते खोदाई करतील त्यामुळे होणाऱ्या नुकसानीसह रसत्याचे काम महावितरण कंपनी करून देणार आहे. त्यामुळे विद्युतवाहिनी टाकल्यानंतर महावितरण रस्ता करून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:23 PM 13/Jan/2025














