रत्नागिरी : परराज्यातील घुसखोरी आणि एलईडीवर बंदी काटेकोरपणे राबवण्यासाठी आजपासूनच कारवाईला सुरुवात करा. पकडलेल्या ट्रॉलर जप्त करा. मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. त्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी, अशी सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.
किनारपट्टीवरील काही बंदरांमध्ये कोणत्या कारवाया चालतात, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांनी त्या कारवाया तत्काळ रोखाव्यात. बांगलादेशी, रोहिंगे भारत अस्थिर करण्यासाठी आले आहेत. एकाही बांगलादेशीला महाराष्ट्रात थारा दिला जाणार नाही. त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही बांगलादेशात पाठवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत नीतेश राणे म्हणाले, ‘मत्स्योत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपले मत्स्योत्पादन गेल्या काही वर्षामध्ये वाढलेले नाही. याची कारणे शोधून त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्या यापुढील काळात केल्या जातील. भारताचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील मत्स्योत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. ज्या चुकीच्या गोष्टींमुळे मत्स्योत्पादनात घट होत आहे, त्या गोष्टी तत्काळ रोखल्या जातील. भारत मत्स्योत्पादनात आणण्यासाठी महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय खाते काम करणार आहे. सागरी सुरक्षा, एलईडी मासेमारी, पर्ससीननेट मासेमारी, किनारपट्टीवर अनधिकृत बांधकाम यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काही बंदरांतून देशविरोधी कारवाया केल्या जात आहेत. त्यावर आपल्या विभागाचे लक्ष आहे. त्या कारवाया तत्काळ थांबल्या पाहिजेत, याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिस त्याबाबतची कारवाई करतील, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हजर होते.
स्टीलच्या ५ गस्ती नौकांचा प्रस्ताव
प्रमुख बंदरांसह मिरकरवाडा बंदरावर राज्य, केंद्र सरकारच्या माध्यमातून खर्च झालेल्या निधीचा अहवाल अधिकाऱ्यांकडून मागवला आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीसाठी स्टीलच्या ५ गस्तीनौका देण्याचा प्रस्ताव शासनाने विचाराधीन आहे. अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी आवश्यक निधी, सुविधा मत्स्य व्यवसाय विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले
मी देशविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात
आपण कट्टर हिंदूवादी आहोत, याबदल प्रश्नच नाही; परंतु भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला मानणारा जो मुस्लिम आहे, जो भारताच्या तिरंग्याला सॅल्युट करतो, जो मुस्लिम सर्वधर्मीय सणांमध्ये सहभागी होतो, जो मुस्लिम भारत हा देश आपला आहे, असे मानतो ते सर्व मुस्लिम भारतीय आहेत, असे आपण मानतो. जे देशविरोधी कारवाया करतील त्यांच्याविरोधात आपण शंभर टक्के आवाज उठवणार, अशी स्पष्ट भूमिका नीतेश राणे यांनी मांडली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 14/Jan/2025














