संघटना वाढवायची असेल तर पदाला चिकटलेल्यांना बाजूला करा; ठाकरे शिवसैनिकांचा सूर

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात संघटना वाढवायची असेल, तर प्रथम कार्यकारिणी बदला. शिवसेना संघटना ही काँग्रेसच्या पावलावर चालत असल्यासारखे वाटत आहे. एकाच पदाधिकाऱ्याकडे दहा ते पंधरा वर्षे पदे आहेत. तसे केल्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना जबाबदारी मिळत नाही.

संघटना वाढवायचीच असेल तर पदाला चिटकून राहिलेल्या कार्यकर्त्यांना आधी बाजूला केले पाहिजे आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांकडे संघटनात्मक जबाबदारी दिली पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी चिपळूण येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

येथील माधव सभागृहात सकाळी १९ वाजता शिवसेनेची बैठक झाली. यावेळी तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख शशिकांत मोदी, माजी नगरसेवक बाळा कदम यांच्यासह शिवसेनेचे तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याप्रमुख संजय कदम यांनी जिल्ह्याचे नेतृत्व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याकडे द्यावे, तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला मिळाल्यास ते आमदार जाधव यांना देण्यात यावे, अशी मागणी केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही हीच मागणी उचलून धरली. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते जागेवर आहेत; मात्र नेतेच पक्ष बदलतात नेते आपल्याबरोबर आहेत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असेही कार्यकर्त्यांना ठणकावले. आमदार भास्कर जाधव यांनीही मला चिपळूणच्या शिवसेनेच्या कार्यक्रमाचे नियंत्रण मिळत नाही. कार्यकर्त्यांनी जी भावना व्यक्त केली त्यात काही चूक नाही, असे सांगितले.

माजी खासदार विनायक राऊत म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची संघटनात्मक वाढ होणे गरजेचे आहे. मागील दोन निवडणुकांत शिवसेनेला यश आले नाही; मात्र आगामी निवडणुकीत आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. पक्षासाठी हा कठीण काळ आपला तरीही कार्यकर्त्यांनी डगमगून जाऊ नये, भास्कर जाधव पक्षाचे नेते आहेत.

त्यांना कोणीही डावलणार नाही, रत्नागिरी जिल्ह्यात पक्ष वाढवणारी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. अधिकृत त्याची घोषणा लवकरच केली जाईल विधानसभेतील विरोधी पक्ष नेता पद जाधव यांना देण्याबाबत निर्णय मी घेऊ शकत नाही. तो पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे घेतील. संघटनात्मक बदलासंदर्भात २२ जानेवारीला अंतिम निर्णय घेतला जाईल.

आमदारांच्या आगमनाने कार्यकर्ते शांत
चिपळुणात शिवसेनेच्या होणाऱ्या कार्यक्रमांचे आमदार जाधव यांना निमंत्रण दिले जात नाही. याबद्दल त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली. त्यावेळी जाधव बैठकीला हजर नव्हते; मात्र माजी खासदार राऊत यांनी कार्यकर्त्यांना शांत करताना जाधव बैठकीला येणार असल्याचे सांगत त्याची तुम्ही चिंता करू नका, असे सुनावले. त्याचवेळी आमदार जाधव यांचे बैठकीत आगमन झाले आणि त्यांचे समर्थक, कार्यकर्ते शांत झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 14/Jan/2025