सावर्डे : येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या ९०व्या जयंतीनिमित्त १६ व १७ जानेवारी या कालावधीत सावर्डे येथील स्मृतिगंध या त्यांच्या स्मारकस्थळी जयंती महोत्सव आयोजित केले आहे. यानिमित्त पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे मी कसा घडलो व प्रसिद्ध उद्योजक मंदार भारदे यांचे व्यवसाय पंथे चालावे, या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डेतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाचा शिक्षणमहर्षीं गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्काराने राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट चिपळूण यांना सन्मानित केले जाणार आहे. १६ रोजी सकाळी साडेआठ वाजता भक्तीसंगम कार्यक्रम अश्विनी थिएटर्स यांच्यावतीने सादर केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता माजी खासदार निकम यांच्या कर्तृत्ववान कारकिर्दीवर आधारित चित्रपट निर्मिती मुहूर्त केला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता भजन संध्या हा कार्यक्रम सह्याद्री परिवार कर्मचारी वृंद यांच्यावतीने आयोजित केला आहे.
१७ रोजी सकाळी साडेआठ वाजता गीतांजली, साडेनऊ वाजता गोविंदराव निकम जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धा व सह्याद्री विज्ञानमंच आयोजित सह्याद्री प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे. सकाळी ११ वाजता व दुपारी तीन वाजता सह्याद्री युवा कलाविष्कार सादर केला जाणार आहे.
रात्री आठ वाजता श्री वाघजाई देवी नमन नाट्यमंडळ ओझरेखुर्द गुरववाडी (संगमेश्वर) यांचे नमन कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेश महाडिक यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 14/Jan/2025
