वाशिष्ठीतून चार हजार घनमीटर गाळ उपसा

चिपळूण : चिपळूणमध्ये 2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. आ. शेखर निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि यामुळे पुराची तीव्रता काहीअंशी कमी झाली. आता या वर्षीदेखील पावसाळ्यानंतर शहरात ठिकठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गत पंधरा दिवसांत वाशिष्ठी नदीपात्रातून 4 हजार घ. मी. गाळ काढण्यात यश आले आहे. त्यामुळे यंदाही गाळ काढण्याची मोहीम जोरदारपणे राबविणे गरजेचे आहे.

2021 मध्ये महापुरामुळे चिपळुणात करोडोंचे नुकसान झाले. बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच नागरी वस्तीलाही तडाखा बसला. यानंतर चिपळूण बचाव या मोहिमेने जोर धरला. सुमारे महिनाभर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर केलेल्या साखळी उपोषणानंतर राज्य सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. अखेर जलसंपदा विभागाने राज्यातील सर्व यंत्रणा चिपळुणात आणून वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य दिले. गाळ काढण्यासाठी तीन टप्पे ठरविण्यात आले.

पोफळी ते खेर्डी, खेर्डी ते गोवळकोट बंदर आणि गोवळकोट बंदर ते दाभोळ खाडी अशा तीन टप्प्यात गाळ काढण्याचे ठरविण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत दुसर्‍या टप्प्यातीलच काम सुरू आहे. शासनाने सुरुवातीला 10 कोटींचा निधी दिला. त्या माध्यमातून बहादूरशेख पूल, पेठमाप, बाजार पूल, उक्ताड आदी भागात गाळ काढण्यात आला. पावसाळ्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात वाशिष्ठी पुलानजिक, गोवळकोट चर, शिरळ येथील बेट हटविण्याचे काम सुरू झाले आहे. सद्यस्थितीत तीन पोकलेन, सात मोठे डम्पर व सहा खासगी डम्परद्वारे गाळ उपसा केला जात आहे. नगर परिषदेने सूचविलेल्या जागेत उपसलेला गाळ टाकला जात असून शहरातील विरेश्वर कॉलनीमधील भागात गार्डनचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी हा गाळ टाकला जात आहे. या शिवाय शहरातील काही खासगी जागांमध्ये गाळ टाकण्यात येत आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

गाळ काढण्याच्या कामामधील गेल्यावर्षीचे 2.25 कोटी रूपये शिल्लक होते. यावर्षी महायुती शासनाने साडेचार कोटींचा निधी मंजूर केला. अशा एकूण 6.75 कोटीच्या निधीतून हा गाळ काढला जात आहे. मात्र, अद्याप शिव नदीतील एकाही टप्प्यातील गाळ काढण्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिक जोमाने यंत्रणा लावणे गरजेचे आहे.

मेरिटाईम बोर्डाची गाळ उपशाला मंजुरी हवी…
महापुरानंतर नाम संस्थेच्या माध्यमातून चिपळूणला मोठी मदत झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ काढण्यासाठी नाम संस्थेकडून यंत्रणा उपलब्ध करण्यात आली तर शासनाने डिझेलसाठी पैसे दिले. यामुळे या कामाला मोठी गती मिळाली. त्यामुळे 2021 नंतर चिपळुणात पुराची तीव्रता कमी झाली आहे. जर शासनाने वाशिष्ठीच्या तिनही टप्प्यातील गाळ पूर्णपणे काढला तर चिपळूण पूरमुक्त होईल. त्यासाठी मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत येणार्‍या गोवळकोट धक्का ते दाभोळ खाडी दरम्यान गाळ काढण्यासाठी व नदीमध्ये निर्माण झालेली बेटे काढण्यासाठी परवानगी द्यावी, म्हणजे वाशिष्ठीला येणारे पाणी न अडता पुढे निघून जाईल आणि चिपळूण कायमचे पूरमुक्त होईल. यासाठी शासनाने मंजुरी देणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 14-01-2025