रत्नागिरी : आभार संस्था संचालित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ महिला शाखेने वर्षभरात अनेक उपक्रम साजरे केले. या मंडळाने सर्वच क्षेत्रात केलेल्या उपक्रमाचा स्पर्श म्हणजे हा प्रेरणादायी आहे, असे उद्गार दीपलक्ष्मी पाखरे यांनी काढले.
जिल्हा प्रासादिक भजन मंडळ महिला शाखेमार्फत रत्नागिरीतील मराठा भवनात मकर सक्रांतीनिमित्त जल्लोष महिला भजनी मंडळाचा हा कार्यक्रम झाला. त्या वेळी पाखरे बोलत होत्या. या वेळी मंडळाच्या अध्यक्षा प्रेरणा विलणकर, नलावडे काकी, वंदना देसाई, अर्चना उत्तेकर, मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर, शरद गोळपकर, नमनसम्राट यशवंत वाकडे, नाट्य कलाकार सागर मायंगडे, दादा वाडेकर आदी उपस्थित होते.
या वेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात झाली. भजन मंडळाने विखारेगोठणे येथे प्रथमोपचार पेटीचे वाटप, दापोली तालुक्यातील ओणनक्से गावात आरोग्य शिबिरात ४७५ रुग्णांची तपासणी, शालेय मुलांच्या स्पर्धा, महाराष्ट्रातील पहिल्या फॅन्सी नौका स्पर्धा, भजन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, नाटके आणि महाराष्ट्रातील पहिले महिलांना प्रेरणा देणारे पारंपरिक नमन हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पाखरे यांनी सांगितले, नलावडे काकी, साईनाथ नागवेकर यांनी मनोगते व्यक्त केली. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाला उपस्थितीसाठी निवड झालेल्या मंडळाच्या पार्श्वगायिका आंकाक्षा वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रभावती मगदूम, शीतल भोसले, बेबी भोरे, अंकिता भाटकर या महिलांचा सन्मान करण्यात आला.
रसिक तल्लीन
महिलांसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा झाली. कार्यक्रमाची रंगत वाढवताना भजनांची स्वरमाला या कार्यक्रमात नवलाई भजन मंडळ (नाचणे), जागृती विकास महिला भजन मंडळ (नाचणे), महालक्ष्मी महिला भजन मंडळ (खेडशी), माऊली महिला भजन मंडळ (रवींद्रनगर, कुवारबाव) आणि एकमुखी दत्तभजन मंडळ (घुडेवठार), रामेश्वर कालिकामाता भजन मंडळ (काळबादेवी), तुळजाभवानी भजन मंडळ, मराठा मंडळ (रत्नागिरी) या भजन मंडळांच्या भजनांनी रसिक मंत्रमुग्ध जाले. सूत्रसंचालन समीक्षा वालम यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 14/Jan/2025
