रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात हॉटेल उद्योग आणि उपहारगृह व्यवसाय विस्तारू लागला आहे. वर्षभरात रत्नागिरी तालुक्यात हॉटेल आणि उपहारगृहे सहाने वाढली आहेत. सहाय्यक कामगार आयुक्तांकडील नोंदीनुसार रत्नागिरी तालुक्यात आता ५५५ हॉटेल आणि उपहारगृहे झाली आहेत. सन २०२२-२३ मध्ये ही संख्या ५४९ इतकी होती.
रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, पावस, थिबा पॅलेससारखी महत्वाची पर्यटनस्थळे आहेत. त्याचबरोबर गडकिल्ले, धबधबे, पुरातन मंदिरे, मत्स्यालय, तारांगण, लोकमान्य टिळक स्मारक अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी शहर हे प्रशासकीय शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे पर्यटक आणि शासकीय कामांसाठी येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. पर्यायाने हॉटेल आणि उपहारगृहांना मागणी वाढू लागली. त्याचाच परिणाम म्हणून हे दोन्ही उद्योग वाढत आहेत.
हॉटेल आणि उपहारगृहे जशी वाढत आहेत तशी कामगारांना रोजी रोटीही उपलब्ध होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील ५५५ हॉटेल्स आणि उपगृहांमध्ये १ हजार ६८१ कामगार नोकरी करत आहेत. सन २०२२-२३ मध्ये असलेल्या ५४९ हॉटेल्स, उपहारगृहांमध्ये १ हजार ६०७ कामगार काम करत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातही एका हॉटेलची भर पडली आहे. सन २०२२-२३ मध्ये या तालुक्यात मोठे हॉटेल नव्हते. आता सन २०२३-२४ मध्ये एक हॉटेल सुरू झाले आहे. खेडमध्ये वर्षभरापूर्वी २०८ हॉटेल्स आणि उपहारगृहे होती. याठिकाणी ५०८ कामगार कार्यरत होते, तितकेच आताही कार्यरत आहेत. चिपळूण तालुक्यातही वर्षभरात या उद्योग व्यवसायात कोणतीही वाढ झालेली नाही.
चिपळूणात सन २०२२-२३ मध्ये ३०९ हॉटेल्स, उपहारगृहे होती त्याठिकाणी ९९२ कामगार काम करत होते. हेच प्रमाण आताही कायम आहे. राजापूर तालुक्यात ४२ हॉटेल्स, उपहारगृहे होती. या ठिकाणी ५८ कामगार कार्यरत होते, ते आताही तितकेच आहेत.
जिल्ह्यात १ हजार ११५ हॉटेल्स…
रत्नागिरी जिल्ह्यात सन २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार १ हजार ११५ हॉटेल्स, उपहारगृह आहेत. या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ३ हजार २५८ कामगारांना नोकरीमुळे रोजी-रोजी उपलब्ध झाली आहे. सन २०२२-२३ मध्ये १ हजार १०८ हॉटेल्स, उपहारगृहांमध्ये ३ हजार १६५ कामगार कार्यरत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 14/Jan/2025
