आयुर्वेदानुसार आचरण करून जीवनमान वाढवा : सुविनय दामले

चिपळूण : आपल्या आयुर्वेदात षडरस आहार सांगितला आहे, तर पाश्चात्य चौरस आहार सांगतात. आपण आपला प्रदेश आणि परिसरातील फळे खावीत. सफरचंदापेक्षाही डाळिंब आणि आवळा ही फळे अधिक उपयुक्त आहेत. वजन कमी करण्यापेक्षा जाडी अल्प करावी. आपल्याला आवडते, आपल्याला पचेल असे आणि आपल्या प्रदेशात जे पिकते ते खावे, आयुर्वेदानुसार आचरण करून १०० वर्षे जगा, असा संदेश शुद्ध भारतीय आयुर्वेदाची चिकित्सा करणारे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील वैद्य सुविनय दामले यांनी दिला.

शहरातील माधव सभागृहात ५० वे वर्ष साजरे करणाऱ्या ‘रोटरी क्लब चिपळूण’च्या वतीने आयोजित ‘याला म्हणतात आयुर्वेद’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी वैद्य सुविनय दामले यांनी, आपले दिनचर्या पाळावी, एखादा दिवस उपवास करावा अथवा एकच पदार्थ दिवसभर खावा, सध्या मनुष्यातील विस्मरण वाढले आहे, याचे कारण स्निग्धता अल्प होण्यात आहे. प्रतिदिन किमान ७ चमचे तेल अंगाला लावावे, आहाराची पथ्य पाळणे हे लसीकरणच आहे, जगण्यासाठी जेवण, प्राणायाम आणि नामस्मरण या तीन गोष्टी आवश्यक आहेत, असे सांगितले.

सूत्रसंचालन वैद्य निनाद साडविलकर यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन मंगेश गोंधळेकर, चिटणीस राजेश ओतरी, प्रसाद सागवेकर, रोहन देवकर, रमण डांगे, शैलेश सावंत, समीर जानवळकर, सुनील वाडेकर, राजीव गांधी आदी उपस्थित होते. अध्यक्ष अविनाश पालशेतकर यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:35 PM 14/Jan/2025