पाचल : ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेले वातावरणातील बदल, पाण्याची टंचाई तसेच अपुरे मनुष्यबळ यामुळे शेती करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. अशा परिस्थितीवर राजापूर तालुक्यातील तळवडे आणि परिसरातील महिलांनी यशस्वी मात करत बारा महिने श्रमदान करत हरितसह आर्थिक क्रांती घडवली आहे. त्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
परिसरात उपलब्ध असलेला पाणीसाठा तसेच कालव्यातून सोडण्यात येणारे अर्जुना धरणातील पाणी येथील महिलांनी शेतात वळवून स्वावलंबनाची बिजे रोवली. मेथी, मुळा, पावटा, चवळी, तूर, काकडी, कोथिंबीर, वांगी, घेवडा यासारखी नगदी उत्पन्न देणारी पिके घेऊन आपला आर्थिक स्रोत प्रबळ केला. पाचल बाजारपेठेत येणाऱ्या हायब्रीड अर्थात घाट माध्यावरील भाज्यांना येथील महिलांनी
पिकवलेल्या गावठी भाज्या पर्याय ठरू लागल्या आहेत. या ताज्या, टवटवीत भाज्यांकडे ग्राहकांचा कल वाढू लागला असून, मोठ्या प्रमाणात भाज्यांची मागणी वाढली आहे. बारमाही भाजी विक्रेता करणाऱ्या रंजना गुरव, जागृती चव्हाण, सुनंदा भालवळकर, विजया पराडकर या सर्व महिला तळवडे गावातील असून, गेले अनेक वर्षे भाजी विक्री व्यवसाय करीत आहेत.
पाचल बाजारपेठेत भाजी विकणाऱ्या महिला लहान-लहान टोपल्यातून भाजी विकताना दिसून येतात. पाचलचे माजी सरपंच स्व. वसंतदादा पाथरे यांनी या महिलांना भाजी विक्रीसाठी मोफत जागा देऊन सामाजिक बांधिलीकी जोपासली होती. कोरोनासारख्या महासंकटावर मात करून या महिला आजही ठामपणे उभ्या राहून आपल्या कुटंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. ही अतिशय कौतुकास्पद अशी बाब आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 14/Jan/2025
