रत्नागिरी : जंगलाची सीमा ओलांडून मानवी वस्तीत आणि शेतशिवारात बिबटे बिनधास्त फिरू लागले आहेत. जंगलतोडीमुळे मानवी वस्तीतच सुरक्षित अधिवास सहजासहजी उपलब्ध झाल्याने बिबट्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. जोडीला प्रजननाचा टक्का देखील वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोठे ना कोठे बिबट्याचे दर्शन होत आहे. जनावरे, पाळीव प्राणी तसेच काही प्रसंगी मानवावर हल्ले करण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. अनेक वेळा बिहिर आणि फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्याच्या घटनाही घडत आहेत.
एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात तब्बल एक हजार ९८५ बिबटे आहेत, देशात सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशात आहेत. नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने बिबटे मानवी वस्तीच्या शेजारी स्थिरावू लागलेत. पर्यायाने भक्ष्यासाठी बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढू लागला आहे. बदलत्या काळात वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास विविध कारणांनी धोक्यात आला. जंगलतोड, बिबट्यांचे लक्ष्य असलेल्या लहान सहान वन्यप्राण्यांची होत असलेली शिकार बिबट्याला जंगलाबाहेर पडण्यास कारणीभूत ठरत आहे. यातून बिबटे बागायती शेतीत मोठ्या संख्येने आढळू लागले. हाच अधिवास त्यांच्यासाठी सुरक्षित आणि सवयीचा बनला आहे. वास्तविक पाहता निसर्गनियमानुसार अनुकूल अधिवासात बिबट्यांची संख्या वेगाने वाढते. त्याची प्रचिती येऊ लागली आहे. बिबट्या मादीचा प्रजनन कालावधी एक वर्षाचा राहतो. एकावेळेस ती तीन पिलांना जन्म देते. कधी कधी चार, तर अपवादात्मक स्थितीत पाच पिलांना देखील जन्म दिल्याची उदाहरणे आहेत. जवळपास पंधरा वीस वर्षांपासून बिबट्याचे प्रजनन मानवी वस्तीच्या शेजारी होऊ लागले आहे. अलीकडील काही वर्षात तर क्विटघाच्या जवळपास तीन ते चार पिढया शेतात जन्माला आल्या आहेत. साहजिकच त्यांच्यात नक्कीच जनुकीय बदल झालेत. शेती हाच त्यांचा आता हक्काचा अधिवास बनला. परिणामी बिबट्यांना पकडून अभयारण्यात सोडले तरी, ते पुन्हा मानवी वस्तीजवळच येतात.
मध्यंतरी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने वन विभागाच्या सहकायनि व्याघ्र श्रेणीतील १८ राज्यांमध्ये बिबट्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार, देशभरात बिबट्यांची संख्या १३ हजार ८७४ असून २०१८ मध्ये ती १२ हजार ८५२ इतकी होती. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने फेब्रुवारी २०२४ मध्ये बिबट्यांच्या गणनेचा अहवाल जाहीर केला. मध्य भारतात बिबट्यांच्या संख्येत वाढ दिसून आली. २०१८ मध्ये ८ हजार ७१, तर २०२२ मध्ये ८ हजार ८२० बिबटे आढळले. याच अहवालानुसार मध्य प्रदेशात सर्वाधिक तीन हजार ९०७, त्यानंतर महाराष्ट्रात एक हजार ९८५, कर्नाटक येथे एक हजार ८७९, तर तामिळनाडू येथे एक हजार ७० बिबट्यांची नोंद आहे.
राज्यात संरक्षित वनक्षेत्रांमध्ये विक्ट्यांची संख्या सुमारे एक हजार ९८५ असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. २०१८ मध्ये ही संख्या एक हजार ६९० होती. या संख्येत आता २०२२ च्या गणनेनुसार १२२ बिबट्यांची भर पडली. राज्यातील संरक्षित क्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या एकूण संख्येपैकी जवळपास ७५ टक्के संख्या ही संरक्षित वनक्षेत्राबाहेर राहत असल्याची नोंद अहवालात आहे. सह्याद्री भूप्रदेशाचा विचार करता, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबटे अधिवासाच्या घनतेमध्ये वाढ झाली आहे. चांदोरी व्याघ्र प्रकल्प हा जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने बिबट्यांची संख्याही जिल्ह्यात कमालीची वाढली आहे. साहजिकच मानव- बिबटे संघर्षदेखील याच जिल्ह्यात अधिक आहे.
आर्थिक मदतीत भरीव वाढ….
वन्यप्राण्यांच्या (बिबट्या) मानवावरील हल्ल्यांच्या घटनात दिली जाणारी आर्थिक मदतीची रक्कम कमी होती. २०२४ मध्ये त्यात वाढ करण्यात आली. यापूर्वी मानवाचा मृत्यू झाल्यास मृताच्या वारसदाराला वीस लाख रुपये दिले जात होते. दिव्यांगत्व आल्यास पाच लाख रुपयांची, तर गंभीर जखमी झाल्यास केवळ एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत दिली जात होती. यामध्ये शासनाकडून वाढ केली असून, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पंचवीस लाख रुपये, जायबंदी झाल्यास साडेसात लाख, तर गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. परंतु यासाठी मनुष्यहानी किंवा प्राणीहानी झाल्यास त्याची माहिती ४८ तासात वन विभागाला किंवा पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 14/Jan/2025
