मार्लेश्वर गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

साडवली : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू मार्लेश्वर तीर्थक्षेत्री (शिखर) येथे मार्लेश्वर आणि गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मंगळवारी (ता. १४) दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडला. या सोहळ्याप्रसंगी मोठी गर्दी होती.

मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. आंगवली मठात प्रथेप्रमाणे मार्लेश्वर देवाचा मांडव घालून या यात्रोत्सवाची सुरुवात झाली. आंगवली मठात मार्लेश्वर देबाला हळद लावण्यात आली व घाणा भरण्यात आला. सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपूर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले. देवरुखच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव व लांजा येथील दिंड्या तर वांझोळेची कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले. पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या व कावड या सर्वांना शिखराकडे प्रस्थान केले. साखरख्याची गिरिजादेवीची पालखी शिखरावर पोहचली होती. सर्वजण शिखरावर पोहचल्यानंतर मंगळवारी सकाळी मुलगी पाहणे, सुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर मार्लेश्वर गिरिजादेवीच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. विवाहसोहळा रायपाटणकर स्वामी, लांजेकर स्वामी, राजपुरोहित प्रकाश स्वामी, रायगडचे महादेव स्वामी आणि देवरूखचे मठपती यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

त्यांची पाद्यपूजा झाल्यावर त्रिपूर उजळण्यात आला. त्यानंतर विवाह‌सोहळ्याला सुरवात होण्यापूर्वी ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कल्याणविधी सोहळा पार पडला.

मार्लेश्वर विकासाबाबत चर्चा
आमदार शेखर निकम यांनी श्री देव मार्लेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा केली. अभिषेक करून त्यांनी मतदार संघातील सर्व जनतेला सुख-समाधान आणि भरभराट लाभावी तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शक्ती मिळावी, असे साकडे घातले. या वेळी मार्लेश्वर मंदिर समिती व ग्रामस्थांनी आमदार निकम यांचा सत्कार केला. मार्लेश्वर परिसरातील विकासात्मक गरजांविषयी माहिती घेतली आणि यावर सकारात्मक चर्चा केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 15/Jan/2025