रत्नागिरी : शहरातील त्याच नामवंत शाळेत आणखी एका वासनांध शिक्षकाचे कारनामे आता उघडकीस येत आहेत. हा शिक्षक विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवत असून 3 मुली त्या शिक्षकाविरोधात पुढे आल्या आहेत. या विरोधात मंगळवारी काही पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत धाव घेतली; मात्र आपले बिंग फुटलेय हे लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाने शाळेतून पळ काढला.
गेल्या दोन दिवसांत सुसंस्कृत रत्नागिरीत एकाच शाळेत दोन वासनांध शिक्षक आणि त्यांच्या कारनाम्यांमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी याच शाळेतील प्रथमेश नवेले या शिक्षकाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. परंतु हे प्रकरण यावरच थांबलेले नसून याच शाळेतील अन्य एका शिक्षकाचे काही अश्लिल मेसेज पालकांच्या हाती लागले. त्यानंतर संतप्त पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेवर धडक दिली.
दरम्यान, शाळेत पालक आले, आता आपले पितळ उघडे पडणार हे लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाने शाळेतून पळ काढला. त्या शिक्षकाबाबत विचारणा केली असता तो रजेवर असल्याचे पालकांना सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तो शिक्षक शाळेत आला होता, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील पालक संतप्त होऊन शाळेत आल्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून जादा कुमक मागवून घेतली होती. क्यूआरटीसह शहर पोलिसांचे एक पथक शाळेत दाखल झाले होते.
मंगळवारी शाळेत आलेल्या पालकांनी त्या वादग्रस्त शिपायाबाबत तक्रारी केल्या. हा शिपाई नशेबाज आहे, नेहमी तो नशेतच शाळेत असतो, अशा नशेबाज शिपायाकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला.
एकामागोमाग एक सलग दोन दिवस वासनांध शिक्षकांचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अजून असे अनेक प्रकार उघडकीस येतील, असा संशयदेखील काही पालकांनी व्यक्त केला आहे. शिक्षकांची भरती झाली त्यावेळी कोणती गुणवत्ता पाहून भरती करण्यात आली? असेदेखील पालकांचे म्हणणे आहे.
‘त्या’ शिक्षकाची पोलिस कोठडीत रवानगी
सोमवारी पोलिसांनी पोस्को गुन्ह्याअंतर्गत अटक केलेल्या प्रथमेश नवेले याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 15-01-2025
