गुहागर पोलिस निरीक्षकांची बदली न झाल्यास अडूर बौद्धजन संघाचे 26 जानेवारीला उपोषण

गुहागर : गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या बदलीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. २६ जानेवारीपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार आहोत, अशी माहिती बौद्धजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. ४० च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेवून दिली. पोलीस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनी बौध्द विहारला ठाळे ठोकणे, सशस्त्र पहारा ठेवणे, पूजापाठापासून वंचित ठेवणे असे आरोप या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षकांवर केले आहेत.

बौद्धजन सहकारी संघ अडूर शाखेतील पदाधिकाऱ्यांनी सेवा मंगल कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. या सर्वांनी धर्मप्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांना गुहागरच्या पोलिस निरीक्षकांनी जीवपूर्वक अटकाव केला. या दिवशी बौध्दविहाराला टाळे ठोकून आम्हाला कार्यक्रम करण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमचा अपमान झाला. आमच्या भावना दुखावल्या गेल्या. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारींचे वृत्त प्रसिध्द झाले. त्यानंतर पोलिस निरीक्षक आपल्यावरील आरोप झटकण्यासाठी, आमच्याशी वैचारिक मतभेद असलेल्या आमच्याच समाजबांधवांचा आधार घेवून दोन गटांमध्ये वाद आहेत असे भासविण्याचा केविलवाणा व बालिश प्रयत्न करत आहेत, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला कोणाचीही तक्रार किंवा हरकत नसताना प्रांताधिकारी यांची ऑर्डर असल्याने तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही, असे धादांत खोटे सांगितले, असे यावेळी सांगण्यात आले.

या संदर्भातील निवेदन या पूर्वीच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले आहे. जर २६ जानेवारीपर्यंत बदली झाली नाही तर आम्ही बौध्दजन सहकारी संघ अडूर, शाखा क्र. ४० चे सर्व पदाधिकारी उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 15/Jan/2025