दापोली : दापोली आगारात सर्व चालक व वाहक हे प्रशिक्षित असून, आगारातील बसेसही शासनाच्या मानांकनानुसार आहेत. त्यामुळे एखादा झालेला अपघात ही मानवी चूक असू शकते त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही अहोरात्र कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन दापोलीचे आगारप्रमुख राजेंद्र उबाळे यांनी सांगितले.
दापोली आगारातील दाभोळ-मुंबई या बसला झालेल्या अपघाताबाबत माहिती विचारण्यासाठी आगारप्रमुख उबाळे यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाकडून महामंडळाच्या मालकीच्या २३०० बस येणार असून, यातील काही बसेसचे लोकार्पण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे केले आहे. रत्नागिरी विभागाला लवकरात लवकर बस मिळाव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दापोली आगारामध्ये सध्या शिवशाही व इतर अशा ७० बस असून, दापोली आगराला किमान एकूण ८० बसची आवश्यकता आहे. आपण वरिष्ठांकडे २० नव्या बसची मागणी केली असून, पहिल्या टप्प्यात १० बस येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक प्रकारातील सुमारे ३६ बस पुढच्या दोन महिन्यांत दापोली आगराला मिळण्याची शक्यता आहे. दापोली आगाराकडे तुळजापूर, अक्कलकोट, नांदेड, गेवराई (बीड), पाजपंढरी-मुंबई, भडवळे-मुंबई अशा नव्या फेऱ्यांची मागणी वारंवार केली जात आहे. त्यामुळे नव्या बसेस मिळाल्यावर दापोली आगरातून यातील काही फेऱ्या सुरू करण्यात येतील.
सर्व चालक-वाहक हे नियमाप्रमाणे प्रशिक्षित असून, विभाग नियंत्रक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 15/Jan/2025