श्री क्षेत्र टेरव येथील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाचा आनंद सोहळा

चिपळूण : अखंड हरिनाम सप्ताहात जात-पात, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता केवळ भक्तिभाव जपला जातो. हाच भक्तिभाव प्रत्येकाला जगण्यासाठी ऊर्जा देतो. त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे, असे मत मान्यवर कीर्तनकारांनी मांडले.

रूढी-परंपरेनुसार शतक पार करणाऱ्या श्री क्षेत्र टेरव (ता. चिपळूण) येथील हनुमान मंदिरात घटस्थापना आणि विधिवत वीणापूजन करून, वीणा चढवून हरिनाम सप्ताहाचा आनंद सोहळा पार पडला. या सोहळ्यात झालेल्या कीर्तनांमध्ये कीर्तनकारांनी सेवा केली. त्यावेळी हे मत व्यक्त करण्यात आले.

वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मंगलमय काकडआरती, संध्याकाळी हरिपाठ व त्यानंतर नामांकित कीर्तनकार हभप जनार्दन आंब्रे, सतीश सकपाळ, अरुण जाधव, अरविंद चव्हाण, दीपक साळवी, विलास मोरे आणि भागवत भारती महाराज यांच्या श्रवणीय कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते. मृदुंग व भजनाची श्रवणीय व लयबद्ध साथ रोशन चव्हाण आणि धारकरी राम साळवी तसेच पराग जाधव यांनी दिली. रात्री हरीजागर करण्यात आला. सतत सात दिवस हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हरिनाम सप्ताहाच्या या कार्यक्रमात ग्रामस्थ भाविकांनी आनंदाने सहभागी होऊन अखंड सेवा अर्पण केली. सप्ताहाची सांगता हभप अरविंद चव्हाण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर हंडी फोडून काला करण्यात आला आणि घट हालवून विधीवत पूजा करून वीणा उतरविण्यात आली. ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन ज्ञानोबा माऊली तुकारामनामाचा गजर करून परिसर मंगलमय केला. सप्ताह समाप्तीचे धार्मिक विधी पार पडल्यानंतर भंडारा झाला. सप्ताहादरम्यान सहकार्य करणाऱ्या सर्वांचा देवस्थान व टेरव ग्रामस्थांच्या वतीने मंदिर सभागृहात यथोचित सन्मान करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 15-01-2025