चिपळूण : धामणवणे पिटलेवाडीतील अतिक्रमण काढण्याबाबत सरपंच, ग्रामसेवकांकडून आदेशाला बगल

चिपळूण : तालुक्यातील धामणवणे पिटलेवाडी येथील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना सात वेळा आदेश दिला होता. कारवाई करण्याबाबत पाठवलेल्या प्रस्तावानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून कार्यवाही केलेली नाही, त्यामुळे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात २६ जानेवारीला राणी मालसिंग कुंभार व मुखत्यार मानसिंग नानबा कुंभार हे चौथ्यांदा उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहेत. यावेळी ते रत्नागिरी जिल्हा परिषद येथे उपोषण करणार आहेत.

गटविकास अधिकारी चिपळूण यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, धामणवणे पिटलेवाडी सरपंच व ग्रामसेवक यांना बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते; मात्र ते हटवले गेले नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेत ४ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेत धामणवण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक सदस्यांच्या अपात्र करण्याबावत सुनावणी झाली होती.

सुनावणीच्यावेळी तक्रारदार स्वतः उपस्थित होते. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती चिपळूण, सरपंच, ग्रामसेवक धामणवणे हे उपस्थित होते; मात्र या सुनावणीत गटविकास अधिकारी चिपळूण यांच्या पत्रावर योग्य तो खुलासा झाला नसल्याचे राणी मालसिंग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी तक्रारदाराचे कोणते म्हणणे ऐकून न घेता आपण जागेची मोजणी करून घ्या आणि मग ठरवा, असे सांगण्यात आले; मात्र याची मोजणी मूळ मालकाने १९९६ सालीच केलेली आहे. त्याला आजपर्यंत कोणीच आव्हान दिलेली नाही.

तीन वेळा उपोषण
गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३९ (१) नुसार ग्रामपंचायत धामणवणे सरपंच व ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत कमिटीने आदेशाचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. तालुक्यातील धामणवणे पिटलेवाडी येथील जागेतील अतिक्रमण हटवण्याबाबत राणी मालसिंग कुंभार व मुखत्यार मानसिंग नानबा कुंभार यांनी तीनदा उपोषण केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 15/Jan/2025