चिपळूण : तालुक्यात २ हजार ७०० महिला बचतगट असून, २७ हजार ८६१ एवढी महिला सभासद संख्या आहे. विविध व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यात ८ हजार १३२ महिलांना लखपती करण्याचे उमेद अभियानचे नियोजन असून, डिसेंबरअखेर ५ हजार ४०० महिला लखपती झाल्या आहेत.
महिला सबलीकरणाला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविष योजना राबवण्यात येत आहेत. महिलांच्या विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्याचा मार्ग महिलांना उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात एकूण ९ प्रभागातून बचतगटांचे काम सुरू आहे. त्यासाठी अधिकारी ७ कर्मचारी आणि प्रभाग समन्वयक मेहनत घेत आहेत. तालुक्यात २ हजार ७०० महिला बचतगट असून, त्यातील १४०० बचतगट विविध व्यावसायाच्या माध्यमातून प्रगती करत आहेत.
अभियानांतर्गत महिलांची आर्थिक समृद्धी होण्यासाठी त्यांना लखपती बनवण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार तालुक्यात ८ हजार १३२ महिलांना लखपती करण्यात येणार आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत विविध व्यवसायातून ५ हजार ४०० महिला लखपती झाल्या आहेत. त्याशिवाय तालुक्यात महिला बचतगटाच्या दोन कंपन्याही स्थापन केल्या आहेत. पेढे प्रभागात कनक हिरकणी महिला शेतकरी उत्पादक कंपनीतून गारमेंट क्लस्टर उभारण्यात येत आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ९६५ महिला जोडल्या गेल्या आहेत. मालदोली प्रभागात मालदोली कोकण क्रांती महिला शेतकरी उत्पादक कंपनीत ६६८ महिलांचा सहभाग राहिला आहे.
या गटाच्या माध्यमातून दाभोळ खाडीत हाऊसबोटचा प्रकल्प राबवण्यात येणार असून, तो अंतिम टप्यात आहे. महिनाभरात हा प्रकल्प मार्गी लागेल.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानातून महिला विविध उद्योग, सेवा, व्यवसाय करत आहेत. यातून रोजगाराची साधनेही निर्माण होत असून महिलांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उन्नती साधती जात आहे. लखपती योजनेत महिलांची निवड झाली असून, बँकेचा कर्जपुरवठा व इतर सुविधा देऊन महिलांना विविध उद्योग सुरू करून दिले जात आहेत. – अमोल काटकर, तालुका अभियान व्यवस्थापक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 15/Jan/2025