वाचनाने मिळणाऱ्या आनंदाची तुलना कशाशीही करता येत नाही : प्रा. विनायक होमकळस

चिपळूण : विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. कथा, कादंबरी, ललित वाङ्मय, वैचारिक साहित्य याचे वाचन करायला हवे. वाचनाने वेळ कसा घालवावा, असा प्रश्न येत नाही. वाचनाने व्यक्तिमत्त्व घडते. सामाजिक प्रश्नाचे भान वाचन केल्याने येते. मोबाईलच्या अतिवापराने वाचनावर निर्बंध आले. मला श्रीमान योगी या पुस्तकाने वैचारिकता आली. तसेच नरहर कुरुंदकरांच्या लेखनाने मी जास्त प्रभावित झालो. अशा वाचनाने जो आनंद मिळतो त्याची तुलना आपल्याला कशाशीही करता येत नाही, असे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयाचे माजी प्रा. विनायक होमकळस यांनी केले. डीबीजे महाविद्यालयात आयोजित वाचन कौशल्य कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वाचन संकल्प अभियाना अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

प्रा. होमकळस पुढे म्हणाले की, ज्याचे वाचन अफाट असते त्याचे व्यक्तिमत्त्वही वेगळेच असते. सभ्य माणसं कोणाच्या नजरेत भरण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ती आपोआपच लोकांच्या नजरेत भरतात. ही सभ्यता वाचनानेच येते. वाचनाने माणूस समृद्ध होत जातो. या कार्यशाळेत प्रा. होमकळस यांनी अनेक साहित्यिकांचे व त्यांच्या लिखाणाचे संदर्भ देत वाचन कसे व कोणते करावे यावर विस्तृत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनीही आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना इतिहासातील दाखले देत लिखाण वाचन प्रक्रिया कशा विकसित होत गेल्या याचे मार्मिक विवेचन केले. ग्रंथपाल डॉ. एस. पी. मोरे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये या अभियानात आयोजित सर्व कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. प्रा. श्वेता चितळे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 15/Jan/2025