गुरुवारचा दिवस बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीसाठी अत्यंत वाईट दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रात्रीच्या सुमारास बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या टॉप अॅक्टर्सपैकी एक असलेल्या सैफ अली खानवर (Saif Ali Khan) घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला होता.
एखाद्या दिग्गज सेलिब्रिटीच्या थेट घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्यामुळे केवळ इंडस्ट्री नव्हे, तर देशभरात खळबळ माजली होती.
वांद्रे येथील ‘सत्गुरु शरण’ इमारतीतील सैफच्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या घुसखोर सर्वात आधी सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या खोलीत गेला. त्यानंतर महिला आणि त्याच्यात वादावादी सुरू झाली. हा आवाज ऐकून सैफ अली खान तिथे आला आणि त्यानं चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घुसखोरानं सैफवर चाकून वार केले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफवर हल्ला करणाऱ्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
हल्लेखोर फक्त पैशाच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात घुसला होता, असं सांगितलं जात आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात, घरात काम करणाऱ्या 56 वर्षीय नर्स एलियामा फिलिप यांनी सांगितलं की, हल्लेखोरानं त्यांच्याकडून 1 कोटी रुपये मागितले आणि त्यांनी विरोध केला तेव्हा त्यानं तिच्यावर काठी आणि ब्लेडनं हल्ला केला.
सैफ आता धोक्याच्या बाहेर
दरम्यान, सैफ अली खानला या घटनेच्या काही वेळातच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा अडकला होता, जो शस्त्रक्रिया करुन काढून टाकण्यात आला. तसेच, काही ठिकाणी प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली. आता सैफच्या जीवीताला कोणताही धोका नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 17-01-2025
