देवरूख बाजारपेठेतील वीजखांब धोकादायक

देवरुख : शहरातील बाजारपेठ, एसटी स्टँडजवळील वर्दळीच्या ठिकाणी असलेला विजेचा खांब धोकादायक स्थितीत आहे. हा खांब कधीही कोसळण्याच्या स्थितीत असून, चालू वीजपुरवठ्यासह तो बाजारपेठेत पडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. या गंभीर स्थितीकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेतून हजारो लोक दररोज विविध कामांसाठी येत असतात. एसटी स्टँडजवळील हा पोल कोणत्याही क्षणी पडून मोठा अनर्थ घडू शकतो. वर्दळीच्या वेळी हा पोल कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो. बाजारातील व्यापारी आणि नागरिकांना या परिस्थितीमुळे सतत भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. व्यापाऱ्यांनी याप्रकरणी सह्यांची मोहीम राबवून महावितरणकडे निवेदन सादर केले; मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

याची दखल घेऊन महावितरणने त्वरित हा धोकादायक पोल बदलावा, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा क्रांती व्यापारी संघटनेने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 17/Jan/2025