रत्नागिरी : माझा परिविक्षाधीन कालावधी रत्नागिरीमध्येच २००९ ला चालू झाला, त्यानंतर जिल्ह्यातील गुहागर व चिपळूण येथे तहसीलदार म्हणून काम केल्याचा अनुभव घेऊन पदोनतीने लातूर येथे उपविभागीय अधिकारी लातूर म्हणून काम करताना विशेष उपयोग झाला. रायगडनंतर आता उपविभागीय अधिकारी म्हणून येथे कार्यरत आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्त माझ्या परिचयाचे असून, असाच स्नेह जपावा, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंदांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते. शांतिनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात हे संमेलन उत्साहात झाले. ३०० सेवानिवृत्त उपस्थित होते. विशेष म्हणजे वय वर्षे ८५ पर्यंतचे सेवानिवृत्त उपस्थित होते.
स्नेहसंमेलनानिमित रत्नागिरी तालुक्यातर्फे स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या १८ सदस्यांचा आणि विवाहास ५० वर्षे पूर्ण झाली त्या १२ सुखी जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीकांत ढालकर यांनी बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग सादर केले. नकलाकार सुरेश ऊर्फ भाऊ पाटील यांनीही कला सादर केली. श्रद्धा चितळे व स्मिता घडशी यांनी सुमधूर गायन केले. रत्नागिरी तालुकाध्यक्ष मारुती आंब्रे, तालुका उपाध्यक्ष मारुतो कांबळे उपस्थित होते.
जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत मोहिते
रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त महसूल वृंदाची जिल्हा कार्यकारिणीची निवड झाली. यात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, उपाध्यक्ष मारुती कांबळे, सरचिटणीस रूपेंद्र शिवलकर व खजिनदार राजेंद्र साळवी यांची निवड करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्याचे तालुकाध्यक्ष व सचिव हे पदसिद्ध सदस्य राहणार आहेत.
आज मी वयाच्या ८१ व्या वर्षी निरोगी राहून ६ संस्थांमध्ये काम करत आहे. दुचाकीवरून स्वतः प्रवास करतो. दररोज योगसाधना व चालणे मला उपयोगी पडते. आपणही सर्वांनी असेच कार्यरत राहा. – जयवंतराव शेट्ये, लांजा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 21/Jan/2025














