हिवाळ्यात तीळगूळचे सेवन शरीरासाठी लाभदायक

रत्नागिरी : मकर संक्रांतीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. घराघरात गृहिणींकडून तिळगुळाचे लाडू तसेच तिळगुळाचे पदार्थ बनविले जातात. तिळगुळाशिवाय संक्रांत सण अपूर्ण ठरते. थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळापासून तयार करण्यात आलेले हे लाडू अत्यंत पौष्टिक असतात. त्याचे सेवन शरीरासाठी उत्तम असते.

तिळगुळाचे लाडू जरी मकरसंक्रांतीकरता बनवले जात असले, तरी देखील हिवाळ्यात त्याचे सेवन आरोग्यासाठी उत्तम ठरत असल्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. मकरसंक्रांती मुळातच हिवाळ्यात येते. तीळ व गुळ हे गरम गुणधर्माचे असल्यामुळे त्यापासून बनवलेले विविध पदार्थ हे शरीरात उष्णता निर्माण करतात. ते आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. तिळामध्ये स्निग्धता असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात त्याचा उपयोग आहारात फायदेशीर ठरतो. तीळ आणि गूळ एकत्र करून खाल्यास ते शरीराला लाभदायक ठरतात. मात्र, त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे, अन्यथा त्याचे परिणाम जाणवू लागतात, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. तीळ व गुळाच्या सेवनाचे फायदे तिळामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, व जीवनसत्व, मिनरल्स, फायबर, अँटी ऑक्सिडेंट्स आणि शरीराला आवश्यक घटक असतात. तिळाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. बद्धकोष्ठतेपासून सुटका, पचनक्रिया सुधारते, त्वचा व केसांसाठी उपयुक्त, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.

विविध फायदे…
तीळ व गूळ दोन्ही हृदयासाठी फायदेशीर आहेत. हिवाळ्यात शरीरामध्ये उष्णता टिकून रहावी यासाठी तीळ आणि गुळाचा उपयोग करतात. तीळ व गुळ हे कॅल्शियम, मॅगनेशियम, लोह, झिंक, सेलेनियम शरीराला पुरवते. हृदयासाठीसुद्धा ते फायदेशीर असून, थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी असते. म्हणूनच संक्रांतीला गूळ पोळी, तीळगूळ पोळी आवडीने खाल्ली जाते. तीळ व गुळाचे सेवन शरीरासाठी लाभदायक असते, अशी माहिती रत्नागिरीचे डॉ. अभिजित देसाई यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:51 PM 23/Jan/2025