लांजा वनविभागाकडून गतिमान मोहीम; वैद्यकीय तपासणीनंतर दीड वर्षाच्या नर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त
लांजा: Leopard Rescue Lanja | रविवारी लांजा तालुक्यातील इसवली येथे वनविभागाने अत्यंत कौतुकास्पद आणि गतिमान कामगिरी केली. तालुक्यातील इसवली पाथरवाडी येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागाने अवघ्या तासाभरात सुखरूप बाहेर काढले. २१ जून रोजी दुपारी राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेत बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून, आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे वेळेत मिळाली माहिती
२१ जून रोजी रविवारी सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास इसवली गावातील ग्रामस्थ अक्षय गुरव यांना पाथरवाडी येथील सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ या घटनेची माहिती लांजा वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची कल्पना दिली आणि बचाव साहित्यासह घटनास्थळाकडे कूच केली.
लोखंडी पिंजऱ्याच्या साहाय्याने यशस्वी बचाव मोहीम
लांजा वनपरीमंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम विहिरीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विहिरीमध्ये दोरीच्या साहाय्याने लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. काही वेळातच बिबट्या या पिंजऱ्यात सुरक्षितपणे शिरला. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक पिंजरा वर ओढून बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. रविवारी दुपारी १२:३५ वाजेपर्यंत ही संपूर्ण रेस्क्यू मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली.
दीड वर्षाचा नर बिबट्या सुस्थितीत
विहिरीतून बाहेर काढलेल्या बिबट्याची लांजा येथील सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास अनुसे यांनी सविस्तर वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीदरम्यान सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे दीड वर्ष असल्याचे समोर आले. बिबट्याला कोणतीही अंतर्गत किंवा बाह्य दुखापत झाली नसून तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितरीत्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अन् टीमवर्क
सदर यशस्वी मोहीम विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी विक्रम गुरव यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष घटनास्थळी लांजा वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, वनरक्षक श्रावणी पवार यांच्यासह रेस्क्यू टीमचे सदस्य अमित लांजेकर व सागर साळवी यांनी प्रत्यक्ष कामगिरी बजावली. या मोहिमेदरम्यान इसवली गावचे पोलीस पाटील दत्ताराम आपणकर, स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी वनविभागाला सहकार्य केले.
वन्यजीव संकटात असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
कोकणातील ग्रामीण भागात वन्यजीव मानवी वस्तीजवळ येण्याच्या घटना घडत असतात. या पार्श्वभूमीवर, “अशा प्रकारच्या घटना घडल्यास अथवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी वन्यप्राण्याला इजा न करता किंवा स्वतःचा जीव धोक्यात न घालता तत्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९०९६५७८७६१ या क्रमांकावर संपर्क साधावा,” असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 22-06-2026














