Shastri River Drowning: शास्त्री नदीत अंघोळीसाठी गेलेल्या चुलत्यासह ९ वर्षीय पुतणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू

संगमेश्वर: Shastri River Drowning | संगमेश्वर तालुक्यातून एक अत्यंत चटका लावणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. तालुक्यातील कोंड उमरे येथे शास्त्री नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या ५० वर्षीय चुलत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण संगमेश्वर परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे.

मिरगाच्या राखणीसाठी आले होते कुटुंब गावी

या दुर्दैवी घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोंड उमरे येथील स्थानिक रहिवासी रमेश कांबळे यांच्या घरी रविवारी ‘मिरगाची राखण’ हा पारंपरिक सण होता. या सणाच्या निमित्ताने त्यांचे भाऊ संतोष कांबळे हे शनिवारी आपल्या कुटुंबासह मुंबईहून गावी आले होते. सणाचा कौटुंबिक माहोल असतानाच रविवारी दुपारी काळाने घात केला.

पुतणीच्या हट्टापायी चुलते गेले होते नदीवर

संतोष कांबळे यांची ९ वर्षांची मुलगी स्वरा हिने रविवारी दुपारच्या सुमारास नदीवर अंघोळीला जाण्याचा हट्ट धरला. पुतणीचा हट्ट पुरवण्यासाठी तिचे चुलते रमेश कांबळे (वय अंदाजे ५० वर्षे) हे तिला घेऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गावातील शास्त्री नदीच्या पात्रात असलेल्या ‘टवली डोहात’ गेले होते.

नातेवाईक शोधायला गेले अन् स्वराचा मृतदेह तरंगताना दिसला

नदीवर जाऊन बराच वेळ झाला तरी रमेश कांबळे आणि चिमुरडी स्वरा दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कांबळे कुटुंबातील नातेवाईक काळजीत पडले आणि त्यांनी नदीकाठाकडे धाव घेतली. नदीवर पोहोचल्यानंतर नातेवाईकांना स्वराचा मृतदेह पाण्याच्या पातळीवर तरंगताना आढळून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच नातेवाईकांनी तात्काळ मदतीसाठी आरडाओरड केली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.

शोधमोहिमेदरम्यान चुलत्याचाही मृतदेह सापडला

ग्रामस्थांनी तातडीने नदीच्या पात्रात उतरून शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच स्वराचे चुलते रमेश कांबळे यांचाही मृतदेह टवली डोहाच्या पाण्यात मिळून आला. एकाच कुटुंबातील दोघांचा अशा प्रकारे बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट होता ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी (Post-Mortem) संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. या संपूर्ण प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास अधिकृतपणे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 22-06-2026