Nagpur MLC Election Result: भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले – अतुल लोंढे

नागपूर: Nagpur MLC Election Result | नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार राजीव पोतदार यांनी ६८२ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अतुल लोंढे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांना अवघी १३० मते मिळाली आहेत. या निकालामुळे नागपूरमध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी व मोठ्या प्रमाणावरील मतफूट चव्हाट्यावर आली आहे.

मविआच्या संख्याबळाला भगदाड; हक्काची मते घटली

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे हक्काचे १७० मतदार (नगरसेवक) होते, तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ २११ च्या घरात होते. असे असतानाही मविआचे उमेदवार अतुल लोंढे यांना प्रत्यक्षात केवळ १३० मते पडली. याचा थेट अर्थ असा की, काँग्रेसच्या किमान ४० लोकप्रतिनिधींनी आणि महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांच्या मतदारांनी थेट भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. ही मतफूट काँग्रेससाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.

‘प्रत्येकी १० लाख देऊन १०० मतांची क्रॉस वोटिंग’

या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आणि थेट आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केले आहेत. “भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये देऊन तब्बल १०० मतदारांची ‘क्रॉस वोटिंग’ (पक्षविरोधी मतदान) करून घेतली आहे,” असा खळबळजनक दावा लोंढे यांनी केला. मात्र, असे असले तरी महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या फुटलेल्या या मतांसंदर्भात आपण पक्षाकडे किंवा प्रशासनाकडे कोणतीही अधिकृत तक्रार करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘मी हरलो नाही, नैतिकदृष्ट्या जिंकलो’ – अतुल लोंढे

आपली भूमिका मांडताना अतुल लोंढे पुढे म्हणाले, “मुळात मी ही निवडणूक पराभूत झालो नाही, तर नैतिक दृष्टिकोनातून मी जिंकलो आहे. नागपूरमध्ये भाजपच्या राजकीय दबावा समोर मी ठामपणे उभा राहिलो आणि ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. मला मिळालेले १३० मतदार हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे प्रामाणिक लोकप्रतिनिधी आहेत आणि ते विकले गेले नाहीत, हेच या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे.”

महायुतीचे राज्यभरात वर्चस्व; नागपूरसह इतर गड राखले

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या एकूण १७ जागांपैकी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी म्हणजेच महायुतीने १६ जागा जिंकत संपूर्ण राज्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यामध्ये नागपूरसह जळगाव, अमरावती, नांदेड आणि सोलापूर या महत्त्वाच्या जागांचा महायुतीने एकतर्फी विजय मिळवला. केवळ नाशिकच्या एका जागेवर महायुतीला धक्का बसला असून, तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 22-06-2026